

पळसदेव, पुढारी वृत्तसेवा : उजनी जलाशयाच्या पाणीसाठ्यात पुणे व धरण परिसरात पडत असलेल्या पावसामुळे वेगाने वाढ होत आहे. परिणामी, नदीच्या पाणीपातळीत वाढ होत असल्याने लाभक्षेत्रातील शेतकर्यांना विद्युत पंप, पाइपलाइन, केबल व इतर उपकरणे पुरापासून दूर नेण्यासाठी धावाधाव करावी लागत आहे.
पुणे परिसरात होत असलेल्या पावसामुळे नदी, नाले, ओढे भरून वाहत आहेत. हे सर्व पाणी उजनी जलाशयात दाखल होत असून, धरणातील पाणीसाठ्यात प्रचंड वेगाने वाढ होत आहे. मध्यंतरी मायनस 13 टक्के असणारा पाणीसाठा सोमवारी (दि. 18) सकाळपर्यंत 45.18 टक्क्यांवर गेला आहे.
उजनी जलाशयालगतच्या इंदापूर, दौंड, करमाळा आदी परिसरातील शेतकरी आपले विद्युत साहित्य पाण्यापासून काढून दूर ठेवण्यात व्यस्त आहेत. तसेच, धरणातील गाळपेर जमिनीतील हातातोंडाला आलेले कडवळ, मका, कोथिंबीर, शेपू, मेथी आदी पिके पाण्यात जाण्यापूर्वी काढण्यासाठी शेतकर्यांची धांदल उडाली आहे.