

मांडवगण फराटा, पुढारी वृत्तसेवा : ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे इनामगाव (ता. शिरूर) येथील गांधलेमळ्यातील घोडनदीवरील 3 लाख 55 हजार रुपये किमतीचे 56 ढापे चोरून नेण्याचा प्रयत्न फसला. याबाबत लघु व पाटबंधारे शाखेच्या शाखा अधिकारी स्नेहा शंकर पावरा यांनी शिरूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
काही दिवसांपासून घोडनदी पात्रातील शेतीपंपाच्या तांब्याच्या तारा, केबल पळविल्या जात आहेत. आता बंधार्यांचे लोखंडी ढापे चोरटे पळवू लागले आहेत. इनामगाव येथील गांधलेमळा येथे असलेल्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधार्याचे 60 ढापे काही दिवसांपूर्वी पळविण्यात आले. पाटबंधारे विभागाचे यामुळे 3 लाखांचे नुकसान झाले. गांधलेमळा येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधार्याचे लोखंडी ढापे अंदाजे एकूण 350च्या आसपास आहेत. त्यातील 60 ढाप्यांची चोरी काही दिवसांपूर्वी झाली आहे. ढाप्यांची चोरी होऊ लागल्याने विभागाची डोकेदुखी वाढली होती.
तीन ते चार चोरट्यांनी सोमवारी (दि. 25) मध्यरात्री गांधले मळा येथील बंधार्यांचे काढून ठेवलेले सुमारे 56 ढापे टेम्पो (एमएच 12 एचडी 3597) मध्ये ठेवून पळविण्याचा प्रयत्न केला. परंतु, ग्रामस्थांची व पोलिसांची चाहूल लागताच चोरटे टेम्पो व ढापे तेथेच टाकुन पळुन गेले.
या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार जगताप करीत आहेत.