पुणे : इथेनॉलची क्षमता 60 कोटी लिटरने वाढणार: साखर आयुक्त शेखर गायकवाड यांची माहिती

पुणे : इथेनॉलची क्षमता 60 कोटी लिटरने वाढणार: साखर आयुक्त शेखर गायकवाड यांची माहिती
Published on
Updated on

पुणे; पुढारी वृत्तसेवा: 'राज्याची इथेनॉल उत्पादनाची सध्याची क्षमता 160 कोटी लिटर इतकी असून, चालू वर्षीच्या हंगामात त्यात नव्या 40 प्रकल्पांमधून उत्पादित 60 कोटी लिटर्सची भर पडणार आहे. म्हणजेच, हंगामाच्या सुरुवातीला 220 कोटी लिटर इतकी इथेनॉलनिर्मितीची क्षमता होणार आहे,' अशी माहिती साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली. केंद्र सरकारने 2018 पासून महाराष्ट्रातील इथेनॉलच्या 301 प्रकल्पांना मान्यता दिलेली आहे. मात्र, सर्व प्रकल्प अद्याप कार्यान्वित न झाल्याने ते नेमके कोणकोणत्या टप्प्यांवर अडले आहेत? किती अपूर्ण आहेत? त्यांना बँकांच्या कर्जमंजुरीच्या काही अडचणी आहेत का?

त्यांना पर्यावरण विभागाच्या मान्यतेची अडचण आहे काय? मशिनरी बसविण्यात आल्या का? आणि प्रत्यक्षात इथेनॉल उत्पादन कधी सुरू होईल, अशा प्रकारचा महाराष्ट्रातील सर्व प्रकल्पांचा आढावा केंद्र सरकारचे मुख्य साखर संचालक संगीत सिंगला यांनी मंगळवारी (दि. 2) सायंकाळी घेतला. साखर आयुक्त शेखर गायकवाड, साखर सहसंचालक (उपपदार्थ) डॉ. संजयकुमार भोसले, इथेनॉल प्रकल्पांना मान्यता मिळालेले सर्व साखर कारखाने, डिस्टिलरी प्रकल्पधारक, धान्यांपासून इथेनॉलनिर्मिती करणार्‍या प्रकल्पांच्या प्रमुखांनी चर्चेत सहभाग घेतला.

राज्यात सद्य:स्थितीत इथेनॉलचे 96 प्रकल्प सुरू आहेत. त्यांनी गतवर्षी 110 कोटी लिटर इथेनॉलचा पुरवठा केला आहे, तर चालू वर्षी ऑईल कंपन्यांनी काढलेल्या निविदांमध्ये महाराष्ट्राकडून 138 कोटी लिटर इथेनॉलपुरवठ्याच्या निविदा भरण्यात आल्या आहेत. त्यापैकी ऑईल कंपन्यांनी ठरवून दिलेल्या तारखांनुसार इथेनॉलपुरवठा होत असून, तोपर्यंतचा साठा कारखान्यांकडे शिल्लक आहे. राज्यात येणार्‍या 2022-23 च्या हंगामात आणखी इथेनॉल प्रकल्प अपेक्षेप्रमाणे सुरू झाल्यास राज्याची इथेनॉल उत्पादनाची एकूण क्षमता हंगामअखेर 250 कोटी लिटरवर पोहचण्याचा अंदाजही त्यांनी व्यक्त केला.

चार महिने अगोदरच उद्दिष्टपूर्ती…
संपलेला ऊस गाळप हंगाम 2021-22 मध्ये इंधनांमध्ये इथेनॉल मिश्रणाचे महाराष्ट्राचे प्रमाण 10 टक्क्यांइतके अपेक्षित होते. मात्र, आपण तत्पूर्वीच प्रत्यक्षात 10.17 टक्क्यांइतके उद्दिष्ट पूर्ण केलेले आहे. म्हणजे हंगाम संपल्यानंतर 4 महिन्यांपूर्वीच (नोव्हेंबर) उद्दिष्ट पूर्ण केलेले आहे. देशात महाराष्ट्रात ऊस पिकाखालील क्षेत्र वाढत आहे. त्याचा फायदा इथेनॉलनिर्मितीस होण्यासाठी आणि प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यातील अडचणी साखर आयुक्तालयाने लक्ष घालून सोडवाव्यात, अशाही सूचना सिंगला यांनी दिल्याचेही गायकवाड यांनी सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news