पुणे : इंदापुरात सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ!

बावडा येथे शेतकरी सूरज जगताप यांचे बहरलेले सोयाबीन पीक.
बावडा येथे शेतकरी सूरज जगताप यांचे बहरलेले सोयाबीन पीक.

बावडा, पुढारी वृत्तसेवा : सोयाबीनला मिळणारा चांगला दर व जमिनीच्या फेरपालटासाठीचे उत्कृष्ट द्विदल पीक, यामुळे चालू खरीप हंगामामध्ये सोयाबीन पिकाखालील क्षेत्रात गत हंगामाच्या तुलनेत सुमारे दुप्पट वाढ झाली आहे. सध्या सोयाबीन पीकवाढीच्या ते शेंगा लागण्याच्या अवस्थेत आहे.

जगात व देशात सोयाबीनला दिवसेंदिवस मागणी वाढत आहे. सोयाबीनमध्ये सर्वाधिक 42 टक्क्यांपर्यंत प्रोटीन असल्याने शाकाहारी व्यक्तींच्या आहारात सोयाबीनचा समावेश आवर्जून केला जातो. तसेच, सोयाबीनमध्ये 22 टक्के तेल असून, तेलाची मागणीही सतत वाढती आहे. भारतात मध्य प्रदेश राज्यात सर्वाधिक क्षेत्रावर सोयाबीनचे पीक घेतले जाते. गेल्या 15 ते 20 वर्षांपासून विदर्भ, मराठवाड्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातही सोयाबीन पिकाखालील क्षेत्र वाढत चालले आहे.

सध्या बाजारात सोयाबीनला 6 ते 6.5 हजार रुपयांपेक्षा अधिकचा दर असून, हा दर आगामी काळात कायम राहण्याची अथवा वाढण्याची शक्यता आहे, अशी माहिती बावडा येथील सोयाबीन उत्पादक शेतकरी सुरज प्रकाशराव जगताप व दिनकर गायकवाड यांनी दिली.
इंदापूर तालुक्यात उसाचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. एकाच जमिनीमध्ये सतत ऊसपीक घेतल्याने जमिनीची उत्पादकता कमी होत चालली आहे. त्यामुळे अशा जमिनीमध्ये फेरपालटासाठी द्विदल वर्गातील सोयाबीन पिकास शेतकर्‍यांकडून पसंती मिळत आहे. सोयाबीन पिकामुळे जमिनीचा पोत मोठ्या प्रमाणावर सुधारत असल्याची माहिती इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक महावीर गांधी (खोरोची) यांनी दिली.

बावडा येथील युवा शेतकरी सुरज जगताप यांनी एक एकर क्षेत्रावर घेतलेले सोयाबीनचे पीक सध्या दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे. पेरणीसाठी त्यांना एकरी 30 किलो बी लागले. उगवणीनंतर पिकास तीनवेळा औषध फवारणी केली असून, एक खुरपणी झाल्याचे त्यांनी सांगितले. पावसाळ्यात अधूनमधून पडणार्‍या पावसामुळे त्यांना पिकास अद्यापही पाणी द्यावे लागलेले नाही. सध्या त्यांचे सोयाबीनचे पीक चांगलेच बहरले आहे. एकंदरीत, इंदापूर तालुक्यातील शेतकर्‍यांचा सोयाबीन पीक घेण्याकडे कल वाढत चालल्याचे चित्र आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news