पुणे : आर्मी वर्कशॉपमध्ये चोरी; सुरक्षा रक्षकांच्या तपासणीत चोरी उघड

पुणे : आर्मी वर्कशॉपमध्ये चोरी; सुरक्षा रक्षकांच्या तपासणीत चोरी उघड

पुणे; पुढारी वृत्तसेवा: खडकीतील आर्मी बेस वर्कशॉपमधून इलेक्ट्रिक साहित्य चोरी करणार्‍या चौघांना खडकी पोलिसांनी अटक केली.
चौघेही ठेकेदारी पद्धतीने काम करीत असून, रणगाड्यांसाठी वापरण्यात येणारे इलेक्ट्रिक साहित्य चोरून नेत असताना त्यांना तेथील सैन्य दलाच्या सुरक्षा रक्षकांनी तपासणी करताना पकडले. सचिन सिद्धप्पा बनसोडे (वय 32), आमोगसिद्ध केशव आठवले (वय 38), विकास आदिनाथ साबळे (वय 31, तिघे रा. पिंपळे गुरव), मोहन उत्तम रासकर (वय 43, रा. भोसरी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी लष्करातील सुभेदार बाबा बन्सीलाल (वय 48) यांनी खडकी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व आरोपी इलेक्ट्रिशियनचे काम करतात.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खडकीतील आर्मी बेस वर्कशॉपमध्ये लष्करातील रणगाड्यांच्या देखभाल आणि दुरुस्तीचे काम चालते. आरोपी बनसोडे, आठवले, साबळे, रासकर एका खासगी कंपनीकडून ठेकेदारी पद्धतीने आर्मी बेस वर्कशॉपमध्ये इलेक्ट्रिशियनचे काम करण्यासाठी आले होते. आर्मी बेस वर्कशॉपमधून ये-जा करणार्‍या प्रत्येकाची प्रवेशद्वारावर लष्करातील जवानांकडून तपासणी करण्यात येते. बनसोडे, आठवले, साबळे, रासकर टेम्पोतून इलेक्ट्रिक साहित्य, रशियन बनावटीचा रेडिएटर, तसेच अन्य साहित्य घेऊन जात होते. प्रवेशद्वारावर टेम्पोची तपासणी करण्यात आली. तेव्हा इलेक्ट्रिक साहित्य बाहेर विक्रीसाठी नेण्यात येत असल्याचे उघडकीस आले. त्यानंतर या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार देण्यात आली. चौघांना अटक करण्यात आली असून, पोलिस उपनिरीक्षक मोहन साळवी तपास
करीत आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news