पुणे : पुढारी वृत्तसेवा : पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या हस्ते मंगळवारी पोलिस आयुक्तालयातील भरोसा सेल येथे अद्ययावत बालस्नेही पोलिस कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. कैलास सत्यार्थी फाउंडेशन व ज्ञानशक्ती विकासवाहिनी यांच्या सहकार्यातून समुपदेशन कक्षाचेदेखील नूतनीकरण करण्यात आले आहे.
याप्रसंगी पोलिस सहआयुक्त संदीप कर्णिक, अपर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक आयुक्त डॉ. नारायण शिरगावकर, गजानन टोम्पे, होप फॉर चिल्ड्रेन संस्थेच्या संस्थापिका कॅरोलीन अॅडवा, डी. वॉल्टर यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी निडर प्रकल्पअंतर्गत टास्क फोर्स उपक्रमात एक चारचाकी वाहन, चालक व त्यांच्याशी संपर्क करण्यासाठी संपर्क अधिकारी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. ही सेवा पुणे शहर पोलिस दलासाठी 24 तास विनाशुल्क उपलब्ध करून देण्यात आली आहे.
संबंधित वाहनांचे नियंत्रण व देखभाल संस्थेमार्फत केले जाणार आहे. विधीसंघर्षीत, पीडित बालक पोलिस स्टेशन स्तरावर आल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्यासाठी तसेच वैद्यकीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी वाहन उपलब्ध होत नव्हते, तसेच बाल भिक्षेकर्यांवर कारवाई केल्यानंतर त्यांना बाल कल्याण समिती येरवडा येथे घेऊन जाण्यासाठी वाहनाची गरज
भासत होती.
शहरातील विविध पोलिस ठाण्यात बालस्नेही कक्ष हा उपक्रम राबविण्यात येतो आहे. आता आयुक्तालयातील भरोसा सेलमध्येदेखील अद्यावत कक्ष तयार करण्यात आले आहे.