

पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आयटीआय) प्रवेश घेण्याकडे विद्यार्थ्यांची सर्वाधिक पसंती असून, आतापर्यंत शासकीय आयटीआयमध्ये 62.98 टक्के जागांवर प्रवेश पूर्ण झाले आहेत. खासगी आयटीआयमध्ये केवळ 26.66 टक्के जागांवर एकूण 74 हजार 23 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे यंदाही आयटीआय प्रवेशाला 'अच्छे दिन' असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाअंतर्गत येणार्या या प्रवेश प्रक्रियेत शासकीय आयटीआयमधील प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचा ओढा सर्वाधिक असल्याचे दिसून आले आहे.
शासकीय आयटीआयमध्ये 94 हजार 96 जागा आणि खासगी आयटीआयमध्ये 55 हजार 364 जागा, अशा एकूण 1 लाख 49 हजार 460 जागा प्रवेशासाठी उपलब्ध होत्या. प्रवेश प्रक्रियेअंतर्गत आतापर्यंत तीन फेर्या पार पडल्या आहेत. यामध्ये शासकीय आयटीआयमध्ये 59 हजार 264 विद्यार्थ्यांनी, तर खासगी आयटीआयमध्ये 14 हजार 759 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. अजूनही खासगी आयटीआयमधील जवळपास 40 हजार 605 जागा रिक्त आहेत, तर शासकीय आयटीआयमध्ये 34 हजार 832 जागा रिक्त असल्याचे दिसून येत आहे.
यंदा आयटीआयच्या एकूण प्रवेशक्षमतेच्या जवळपास दुपटीहून अधिक अर्ज आले होते. त्यामुळे यंदाही प्रवेशासाठी मोठी चुरस पाहायला मिळत आहे. शासकीय संस्थांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थी खासगी संस्थांकडे वळतात. त्यामुळे आणखी एखाद्या फेरीनंतर खासगी आयटीआयमधील प्रवेश वाढतील. दरम्यान, प्रवेशाच्या चार फेर्या झाल्यानंतर समुपदेशन फेरी सुरू होणार आहे. या फेरीतून आणखी काही प्रवेश होणार आहेत. त्यामुळे यंदा देखील आयटीआयमध्ये विद्यार्थ्यांचे प्रवेश सर्वाधिक होणार असल्याचे चित्र सध्यातरी दिसून येत आहे.
का वाढतोय आयटीआयकडे ओढा?
आयटीआय अभ्यासक्रमांचा कालावधी कमी.
थिअरी अभ्यासक्रमांपेक्षा प्रात्यक्षिकांवर भर.
सरकारी आयटीआयमध्ये शुल्क नगण्य, तर खासगी आयटीआयमध्ये खूप कमी
अनेक प्रकारच्या सरकारी नोकरीसाठी आयटीआयधारक पात्र.
मॅन्युफॅक्चरिंग, ऑटोमोबाईल, लघू-मध्यम उद्योगांमध्ये नोकरीच्या संधी.
खासगी कंपन्यांमध्ये रोजगार उपलब्ध.