पुणे : अमली पदार्थांची तस्करी कुरिअरने; अ‍ॅपद्वारे संपर्क साधत दिली जातेय घरपोच ‘डिलिव्हरी’

पुणे : अमली पदार्थांची तस्करी कुरिअरने; अ‍ॅपद्वारे संपर्क साधत दिली जातेय घरपोच ‘डिलिव्हरी’
Published on
Updated on

अशोक मोराळे

पुणे : शहरात कुरिअरद्वारे अमली पदार्थांची तस्करी होत असल्याची माहिती समोर आली आहे. त्या अनुषंगाने पोलिस सतर्क झाले आहेत.
गेल्या काही दिवसांत गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकांनी तस्करांविरुद्ध कारवाई हाती घेऊन कोट्यवधी रुपयांचे अमली पदार्थ जप्त करीत अनेकांना बेड्या ठोकल्या. त्यामुळे तस्करांनी हा फंडा वापरल्याचे दिसून येते. पोलिसांच्या जाळ्यात आपण अडकू नये, म्हणून तस्करदेखील काळजी घेत आहेत. मोबाईलवरील विशेष प्रकारच्या अ‍ॅपद्वारे एकमेकांसोबत संपर्क साधून ग्रुपद्वारेदेखील अमली पदार्थांची घरपोच डिलिव्हरी दिली जात असल्याचे समजते. त्यामुळे कुरिअर व ट्रान्सपोर्टद्वारे होणार्‍या तस्करीचा बंदोबस्त करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

जिल्हा अमली पदार्थविरोधी कार्यकारी समितीचे पोलिस उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीत हा मुद्दा समोर आला असून, त्या अनुषंगाने सर्वांना खबरदारी घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. या वेळी केंद्रीय वस्तू सेवा कर विभाग, अन्न व औषध प्रशासन, लोहमार्ग पोलिस अशा विविध विभागांचे प्रतिनिधी उपस्थित होते. तस्करांनी प्रामुख्याने शहरातील हायप्रोफाईल परिसरात आपले बस्तान बसविल्याचे दिसून येते. अमली पदार्थविरोधी पथकाने केलेल्या कारवाईवरून हे निदर्शनास आले आहे. दोन वर्षांत कोरोनामुळे अंडरग्राउंड झालेले तस्कर जनजीवन पूर्वपदावर येताच जोरात सक्रिय झाले आहेत.

चालू वर्षात 27 जुलैअखेर दोन्ही पथकांनी तब्बल 3 कोटी 44 लाख रुपयांचे अमली पदार्थ जप्त करून 360 जणांना अटक केली आहे. त्यामध्ये नायजेरियन तस्करांचादेखील समावेश आहे. व्यावसायिक, शैक्षणिक व्हिसावर भारतात आल्यानंतर ते अमली पदार्थ विक्रीचा व्यवसाय करतात. पुणे शहराचा वाढता नावलौकिक पाहता, शिक्षण, नोकरी व व्यवसायाच्या निमित्ताने परराज्यासह विदेशातील तरुण-तरुणी मोठ्या संख्येने पुण्यात वास्तव्यास आहेत.

शहराच्या भोवती निर्माण झालेले आयटी क्षेत्राचे वलय, गडगंज पगाराच्या नोकर्‍या, त्यातूनच उदयास आलेली संस्कृती, मद्याबरोबरच अमली-पदार्थांची नशाखोरी. त्यामुळे मुंबईपाठोपाठ पुणे अमली पदार्थ तस्करांच्या रडारवर असल्याचे दिसून येते. शहरात अमली पदार्थांची तस्करी करणार्‍यांमध्ये प्रामुख्याने नायजेरियन गुन्हेगार आघाडीवर असल्याचे दिसून येते. गोवा, मुंबई येथून कोकेन, ब्राऊन शुगरची तस्करी ते पुण्यात करतात. त्यानंतर कोरेगाव पार्क, मुंढवा, बाणेर, हिंजेवाडी येथील उच्चभ्रू परिसरातील पब, हॉटेलमध्ये त्याची ग्राहकांना विक्री करताना ते पकडले गेले आहेत.

मोबाईल टाळताहेत
पोलिसांना गुंगारा देण्यासाठी अमली पदार्थ तस्कर पुरेपूर काळजी घेताना दिसून येत आहेत. पोलिसांना आपला सुगावा लागू नये म्हणून मोबाईलदेखील त्यांच्याकडून वापरला जात नाही. काही विशिष्ट प्रकारच्या अ‍ॅपद्वारे तस्कर ग्राहकांच्या संपर्कात राहतात. अ‍ॅपद्वारे ग्रुप तयार करून त्यांना अमली पदार्थाची विक्री केली जाते.

तस्कर पारंपरिक तस्करीच्या पद्धती सोडून नवीन तंत्रज्ञानाचा वापर करीत आहेत. कुरिअरद्वारे अमली पदार्थाची तस्करी होत असल्याची माहिती समोर आल्याने पोलिसांनी त्याकडे लक्ष केंद्रित केले आहे.
                                           – श्रीनिवास घाडगे, पोलिस उपायुक्त, गुन्हे शाखा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news