पीएमपीकडे पहिली 7 मीटर लांबीची ई-बस; सिंहगडसह आणखी दोन मार्गांवर आज होणार चाचणी

पीएमपीकडे पहिली 7 मीटर लांबीची ई-बस; सिंहगडसह आणखी दोन मार्गांवर आज होणार चाचणी

Published on

पुणे : पुढारी वृत्तसेवा: अरुंद अशा घाट रस्त्यावर प्रवासी वाहतूक सेवा पुरविण्यासाठी पीएमपीचे 300 छोट्या ई-बस खरेदीचे नियोजन होते. त्यानुसार पहिली 7 मीटर लांबीची ई-बस पीएमपीच्या ताफ्यात दाखल झाली आहे. या बसची शुक्रवारी (दि. 1) सिंहगडसह बोपदेव घाट आणि मध्य वस्तीतील अरुंद रस्त्यावर चाचणी करण्यात येणार आहे. पीएमपी प्रशासन आणि वनविभाग यांनी संयुक्तपणे सिंहगडावर ई-बस सेवा सुरू केली होती. मात्र, महिनाभरातच पीएमपी प्रशासनाला ही सेवा बंद करावी लागली. पीएमपीने येथे 9 मीटर लांबीच्या 12 ई-बसद्वारे प्रवासी सेवा पुरविण्यास सुरवात केली होती.

मात्र, या बस येथील घाट रस्त्यावरील अरुंद वळणांवर व्यवस्थितरीत्या वळण घेत नसल्याचे पाहायला मिळाले. त्यातच सिंहगड घाट रस्त्यावरील तीव्र उतारावर असलेल्या एका वळणावर ई-बसचा अपघात झाला. सुदैवाने येथे असलेल्या कठड्यामुळे बस प्रवाशांसहित खोल दरीत कोसळली नाही. मात्र, या घटनेची दखल प्रशासनाने घेत, 9 मीटरऐवजी 7 मीटर लांबीच्या नव्या 300 बस खरेदी करण्याचा निर्णय घेतला. या बस पीएमपी महापालिकेच्या सहाय्याने खरेदी करणार असून, त्या 300 बसपैकी 1 बस नुकतीच पीएमपीच्या ताफ्यात दाखल झाली आहे. या बसद्वारे पीएमपी चाचणी घेणार असून, ती यशस्वी झाल्यावर उर्वरित बस पीएमपीच्या ताफ्यात दाखल होतील.

नव्या बसची वैशिष्ट्ये
आसनक्षमता – 20 प्रवासी
संपूर्ण वातानुकूलित
प्रदूषणविरहित
इलेक्ट्रिक चार्जिंग
चाचणी मार्ग – सिंहगड घाट, बोपदेव घाट, मध्य वस्ती

अरुंद घाट रस्त्यावर व्यवस्थित प्रवासी सेवा पुरविता यावी याकरिता पीएमपीकडून 7 मीटर लांबीच्या 300 बस खरेदी करण्यात येणार आहेत. त्यापैकी एक बस भेकराईनगर आगारात दाखल झाली आहे. या बसद्वारे शुक्रवारी (दि.1) पुण्यात तीन ठिकाणी चाचणी घेण्यात येईल. त्यानंतरच उर्वरित बस ताफ्यात यायला सुरवात होईल.

                             – दत्तात्रय झेंडे, वाहतूक व्यवस्थापक, पीएमपीएमएल

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news