पिसर्वेतील आगीत दुकाने भस्मसात; लाखोंची हानी

पिसर्वेतील आगीत दुकाने भस्मसात; लाखोंची हानी

नायगाव : पुढारी वृत्तसेवा: पिसर्वे (ता. पुरंदर) येथील श्रद्धा जनरल स्टोअर्सला सोमवारी रात्री अकराच्या सुमारास आग लागली. आगीत श्रद्धा जनरल स्टोअर्स आणि शेजारील सलून ही दोन दुकाने भस्मसात झाल्याने लाखोंचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
श्रद्धा जनरल स्टोअर्सला लागलेल्या आगीत शालेय साहित्य, झेरॉक्स मशिन, फ्रीज, प्लास्टिक वस्तू व इतर साहित्य जळून खाक झाले. पिसर्वेकरांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. परंतु आगीने रौद्र रूप धारण केले होते. रात्री 12 वाजण्याच्या सुमारास जेजुरी व सासवडवरून अग्निशामक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.

त्यांनी 3 ते 4 तासांच्या अथक परिश्रमानंतर आग विझवण्यात यश मिळवले. पिसर्वेकरांच्या प्रसंगावधानाने शेजारील किराणा दुकान, इलेक्ट्रिक वस्तूंचे दुकान व एक ऑफिस आगीपासून वाचवण्यात यश आले. युवकांनी टँकरच्या साहाय्याने आग विझवण्याचा प्रयत्न केल्याने आग नियंत्रणात राहिली. घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही. जेजुरी पोलिसांनी या घटनास्थळाची पाहणी केली. संबंधित दुकानदारांना नुकसान भरपाई मिळण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news