दीपेश सुराणा :
पिंपरी : तरुणाईमध्ये सध्या फिटनेसची क्रेझ वाढली आहे. आजकाल तरुणांना व्यायामाचा अतिरेक करून आणि स्टेरॉईड्ससारख्या पर्यायांचा वापर करून शरीरसौष्ठव कमावण्याची घाई झालेली पाहण्यास मिळत आहे. मात्र, ही घाई आरोग्याच्या दृष्टीने घातक ठरू शकते. आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ हे व्यायामाचा अतिरेक चुकीचा असल्याचे स्पष्टपणे सांगतात. नियमित मात्र प्रकृतीला मानवेल असाच व्यायाम करण्याबाबत ते सुचवितात. तसेच, स्टेरॉईड्स घेणे शरीरासाठी हानीकारक ठरू शकत असल्याने त्याचा वापर टाळण्याचाच सल्ला देत आहेत.
सध्या प्रत्येकाचीच जीवनशैली ही धकाधकीची झाली आहे. त्यातच बैठे काम असल्यास शरीराला आवश्यक व्यायाम मिळत नाही. त्यामुळे लठ्ठपणा वाढत जातो. त्याशिवाय, मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, असे आजार बळावत आहेत. त्यामुळे प्रत्येकाने शरीरासाठी आवश्यक व्यायाम करणे गरजेचेच आहे. चालणे, पोहणे, योगासने, सूर्यनमस्कार, दोरीवरच्या उड्या, सायकल चालवणे, प्राणायाम आदी व्यायाम सहज करता येण्यासारखे आहेत. ज्यांना जीमचा व्यायाम करण्याची सवय आहे, त्यांनी तो व्यायाम देखील एका मर्यादेत करायला हवा.
दोन-दोन तास व्यायाम चुकीचाच
शरीर कमावण्यासाठी जीममध्ये बरेच जण एक ते दोन तास व्यायाम करताना दिसतात. मात्र, कोणत्याही निरोगी व्यक्तीला 45 मिनिटांचा व्यायाम पुरेसा असतो, असे तज्ज्ञ सांगतात. प्रत्येकाने आपली शरीर प्रकृती पाहूनच व्यायामाचा प्रकार निवडायला हवा. तसेच व्यायामाच्या अतिरेकामुळे शरीर स्वास्थ्याला त्याचा फायदा होण्याऐवजी त्रासच होऊ शकतो.
स्टेरॉईड्स शरीरासाठी हानीकारक
ज्यांना नियमित व्यायामाचा कंटाळा असतो, ते बलदंड शरीरयष्टीसाठी स्टेरॉईड्सचा वापर करताना दिसतात. स्टेरॉईड्सचा वापर हा वेगाने धावण्यासाठी तसेच जास्त वजन उचलण्यासाठी किंवा चांगल्या शारिरीक हालचालींसाठी केला जातो. जे पुर्णपणे चुकीचे आहे. स्टेरॉईड्स घेणे शरीरासाठी हानिकारक असते, असे तज्ज्ञ सांगतात.
कोणता आहार घ्याल?
सकस आणि ताजा आहार घ्यायला हवा. दूध, भाजीपाला, फळे, सलाड, मोड आलेली कडधान्ये, विविध उसळ, हातसडीचा तांदूळ, पौष्टिक लाडू, पनीर, दही यांचा आहारात समावेश असावा.
काय टाळाल?
फास्टफूड, पॅकेज फूड, 'रेडी टू इट फूड' टाळावे. आहारात मीठ, साखर, मैदा यांचे प्रमाण कमी असावे. बाहेरील अन्नपदार्थ खाणे टाळावे.
कोणत्याही निरोगी व्यक्तीला 45 मिनिटांचा व्यायाम पुरेसा असतो. प्रत्येकाने प्रकृतीला मानवेल एवढाच व्यायाम करावा. चालणे, योगासने, सूर्यनमस्कार, पोहणे, ध्यानधारणा, प्राणायाम आदी व्यायाम शरीरासाठी उपयुक्त ठरू शकतात. स्टेरॉइड्स घेणे शरीरासाठी अनैसर्गिक असल्याने हानीकारक आहेत. त्याउलट सकस आणि संतुलित आहार घ्यायला हवा. 'रेडी टू इट फूड', 'फास्ट फूड' टाळावे.
– डॉ. सीमा निकम, निसर्गोपचार आणि आहारतज्ज्ञ
शरीरसंपदा कमावण्यासाठी नियमित व्यायाम हवा. त्यामध्ये शॉर्टकट् नसतो. तरुणांनी जीम लावताना एक ध्येय ठरवून व्यायाम केला पाहिजे. जास्त 'वर्कआऊट' केल्याने फायदा होत नाही. तुमची ताकद, कार्यक्षमता आणि शरीराची लवचिकता व्यायामाद्वारे वाढली पाहिजे.
– नीलेश गवारे, जिम ट्रेनर.