पिंपरी : सुखी संसारात सोशल मिडियामुळे संशयाची पाल

पिंपरी : सुखी संसारात सोशल मिडियामुळे संशयाची पाल
Published on
Updated on

संतोष शिंदे: पिंपरी : बायकोचा कॉल नेहमी वेटिंग लागतो…! अलीकडे ती माझ्याशी नीट बोलत नाही.., रात्री -अपरात्री नवरा व्हॉट्सअॅपवर चॅट करीत असताना गालात हसतो, साहेब त्याचे बाहेर काहीतरी प्रकरण आहे …, पोलिस ठाण्यात अशा प्रकारच्या तक्रारींचा अक्षरशः पाऊस पडू लागला आहे. यातून झालेले वाद विकोपाला जाऊन खुनासारखे प्रकार घडत आहेत. पिंपरी – चिंचवडमध्ये मागील सहा महिन्यांत सहा महिलांची पतीनेच हत्या केल्याची पोलिस दप्तरी नोंद आहे. यातील बहुतांश प्रकरणात अनैतिक संबंधाचा 'अँगल' असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.

मागील काही वर्षात गरीब- श्रीमंत हा भेद मिटून मोबाईल नावाचे यंत्र घराघरात जाऊन पोहचले. त्यामुळे सोशल मीडियाचा वापर सर्रास होऊ लागला. फेसबुक, व्हॉटसअॅप, इंस्टाग्रामवर तरुणाईच नाही, तर अबाल- वृद्ध देखील रमू लागले आहेत. सध्या अनेक घराघरात विवाहित पुरुष आणि स्त्रिया तासन्तास मोबाईलमध्ये डोके घालून बसल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. त्यामुळे सातजन्माची लग्नगाठ बांधलेल्या दाम्पत्यांमध्ये विसंवाद वाढला आहे. याचाच परिणाम म्हणजे नवरा आणि बायकोच्या मनात एकमेकांविषयी संशयाची पाल चुकचुकली जात आहे. यातून क्षुल्लक कारणावरून नवरा – बायकोमध्ये कडाक्याची भांडणे होऊ लागली आहेत.

पिंपरी- चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत मागील सहा महिन्यांत सहा महिलांचे खून झाले आहेत. प्रथमदर्शनी खून करण्यामागे काहीतरी क्षुल्लक कारण असल्याचे भासवले जाते; मात्र काही अपवाद वगळता सर्व खून हे अनैतिक संबंधाच्या संशयावरून झाल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. त्यामुळे सोशल मीडियाच्या या जगात नैतिकता जपण्याचे मोठे आव्हान आजच्या पिढीसमोर असल्याचे मत जाणकारांकडून व्यक्त केले जात आहे.

पोलिसांची मोठी अडचण
नवरा – बायकोची तक्रार पोलिसांकडे आल्यानंतर सुरुवातीला संबंधित दाम्पत्याचे समुपदेशन केले जाते. तुटण्याच्या मार्गावर असलेला संसार जोडण्यासाठी पोलिस कलुषित झालेली मने जुळवण्याचा अतोनात प्रयत्न करतात; मात्र संशयाची पाल चुकचुकल्यास पोलिसही हतबल ठरतात. त्यामुळे नवरा-बायको एकत्र असताना बंद खोलीत घडणार्या गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यास पोलिस असमर्थ ठरत असल्याचे दिसून येत आहे.

मुलांचे भवितव्य अंधारात
अनैतिक संबंधाच्या संशयावरून बायकोची हत्या केल्यानंतर नवरा तुरुंगात जातो. त्यामुळे त्यांची मुले अनाथ होतात. आई- वडील दोघेही जवळ नसल्याने नातेवाईक देखील फार काळ त्यांना सांभाळू शकत नाही. शेवटी काहीही चूक नसलेल्या मुलांना कुठेतरी अनाथ आश्रमात दिवस घालवावे लागतात.

चालू वर्षात सहा महिलांचा पतींकडून खून
प्रियकरासाठी पतीला संपवले – प्रियकरासाठी महिलेने तिचा पती अनिल उत्तमराव राठोड (35) यांचा खून केला. याप्रकरणी अनिल यांचे भाऊ रविकुमार उत्तमराव राठोड (32, रा. परभणी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यातील विशेष बाब म्हणजे आरोपी महिलेने खून केल्यानंतर पतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा कांगावा केला होता; मात्र पोलिसांना संशय आल्याने या प्रकरणाला वाचा फुटली.

संशयी वृत्ती हा एक प्रकारचा मानसिक आजार आहे. घरात कोणीही विनाकारणच संशयीपणाने वागत असल्यास त्याला वेळीच मानसोपचार तज्ञाकडे नेले पाहिजे. मनामध्ये वारंवार संशय तयार होणे, चिडचिडेपणा वाढणे, ही या आजारांची लक्षणे आहेत. अशा रुग्णांच्या सुरुवातील आम्ही काही तपासण्या करतो. ज्यामुळे त्याच्या संशय हा खरा किंवा खोटा असल्याचे समोर येते. त्यानुसार, उपचारपद्धती वापरून रुग्णाला बरे केले जाते. योग्य वेळी उपचार घेतल्याने पुढील धोके टळू शकतात.
– डॉ. मनजीत संत्रे, प्राध्यापक व प्रमुख, मानोसपचार विभाग, यशवंतराव चव्हाण रुग्णालय, पिंपरी- चिंचवड.

नैतिकता जपण्याची गरज
विवाहित पुरुष आणि महिला यासह सर्वांनी आपले नैतिक भान जपण्याची गरज आहे. अनेक प्रकरणांमध्ये पती-पत्नीमध्ये विसंवाद वाढल्याने संशयाला खतपाणी मिळाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे नवरा बायको घरात असताना मोबाईलचा कमीत कमी वापर करावा. सर्वांनी आपल्या पती किंवा पत्नीशी एकनिष्ठ राहिल्यास अशा प्रकारचे गंभीर गुन्हे घडणार नाहीत.
– अंकुश शिंदे,
पोलिस आयुक्त, पिंपरी- चिंचवड.

उदा. चारित्र्याच्या संशयावरून आरोपी राहुल गोकुळ प्रतापे (30 रा. पुनावळे मूळ रा. घारगाव, ता. परांडा, जि. उस्मानाबाद) याने कोयत्याने वार करून पत्नीचा निर्घृण खून केला. ही घटना पुनावळे येथे घडली. याप्रकरणी घरमालक नवनाथ रामदास बोरगे (32, रा. पुनावळे) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news