पिंपरी : सार्वजनिक शौचालय साफसफाईचे काम महिला बचत गटांकडे

पिंपरी : सार्वजनिक शौचालय साफसफाईचे काम महिला बचत गटांकडे

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरात सार्वजनिक शौचालय बांधण्यात आली आहेत. त्यांची अधिक चांगल्या प्रकारे साफसफाई, देखभाल व दुरूस्ती व्हावी म्हणून महिला बचत गट व युथ क्लबला शौचालय साफसफाईची जबाबदारी निविदा न काढता थेट पद्धतीने देण्यात येत आहे. आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांच्य या निर्णयानुसार आरोग्य विभागाने काही शौचालय महिला बचत गटांना चालविण्यास दिले आहेत.

पालिकेने शहर स्वच्छ व सुंदर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अंतर्गत अनेक नवीन संकल्पना शहरात राबविण्यात येत आहेत. दाट लोकवस्ती, झोपडपट्टी व चाळ आदी ठिकाणी असलेले सार्वजनिक व सामुदायिक शौचालयाची साफसफाई, देखभाल व दुरूस्तीचे काम त्या ठिकाणच्या स्थानिक महिला बचत गट, संस्था व युथ क्लबला देण्याचा निर्णय आयुक्त पाटील यांनी घेतला आहे. त्यामुळे जबाबदारी वाढून शौचालय अधिक चांगल्या प्रकारे स्वच्छ राहतील, असा त्याचा विश्वास आहे. त्या अंतर्गत शहरातील तीन ते चार शौचालय महिला बचत गटांना चालविण्यासाठी देण्यात आले आहेत.

शास्त्रीनगर येथील 18 सीटचे 2 शौचालयांची साफसफाई, देखभाल व दुरूस्तीचे काम तेथील नवी दिशा महिला बहुउद्देशीय मंडळास 28 मार्च ते 27 सप्टेंबर 2022 असे सहा महिन्यांसाठी प्रायोगित तत्वावर देण्यात आले आहे. प्रतिमाह प्रति सीट 900 रूपये दराने सहा महिन्यांचा खर्च 97 हजार 200 रूपये खर्च अपेक्षित आहे. अशा प्रकारे काम करण्यास स्थानिक महिला बचत गट, महिला संस्था, संघटना व युथ क्लब असल्यास आरोग्य विभागास संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news