पिंपरी : सर्रास होतोय अवैध सीएनजी किटचा वापर

पिंपरी : सर्रास होतोय अवैध सीएनजी किटचा वापर
Published on
Updated on

राहुल हातोले : पिंपरी : शहरात पेट्रोल आणि डिझलच्या किमती गगनाला भिडत असल्याने वाहनचालकांचा कल सीएनजीकडे वाढला आहे. शहरात सध्या 30 अधिकृत विक्रेते आहेत. मात्र, सीएनजी किट बसविणेही महागडे आहे. त्यामुळे वाहनचालक अवैधरीत्या किट बसवून घेत आहेत. अशा वाहनांवर आरटीओ कारवाई करीत नसल्याने अवैध किट बसवून देणार्‍यांचा सुळसुळाट झाला आहे.

शहरात आरटीओ अधिकृत विक्रेते (अ‍ॅथॉराईज डिलर) हे मान्यताप्राप्त किट बसवून देतात. मात्र, अनधिकृत सीएनजी किटमुळे वाहनांच्या इंजिनमध्ये सतत बिघाड होण्याच्या तक्रारी आहेत. तसेच वायर लिक झाल्यास आगीची दुर्घटना घडू शकते. अशा वेळी कुठल्याच विम्याचे कव्हर मिळत नाही. तरीही अवैध किट बसविणार्‍या गॅरेजकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे कमी किंमतीत अनधिकृत किट बसवून देणार्‍यांचा सुळसुळाट झाला आहे.

अवैधरित्या सीएनजी किट बसविलेल्या वाहनांवर आरटीओकडून कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे अशा वाहन चालकांनी त्वरित वाहनांमध्ये मान्यता प्राप्त आणि वैधरित्या कीट व सिलेंडर बसवून घ्यावे.
– अतुल आदे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, पिंपरी-चिंचवड शहर 

असा मिळतो सीएनजी किट परवाना
पिंपरी-चिंचवड शहरात एकूण तीस अधिकृत विक्रेते (अ‍ॅथॉराईज डिलर) आहेत. शहरातील डिलरला परवाना घेण्यासाठी प्रथम पुणे प्रादेशिक परिवहन अधिकार्‍यांकडे अर्ज दाखल करावा लागतो. यानंतर कागदपत्रांची पडताळणी आणि परवान्यासाठी मुंबई परिवहन आयुक्तांकडून निर्देश आल्यानंतर पुणे विभागाच्या वतीने पिंपरी-चिंचवड येथील मोशी कार्यालयात परवाना पाठविला जातो. त्यांची मान्यता मिळाल्यानंतर उपप्रादेशिक विभागामार्फत डिलरला सीएनजी किट बसविण्याचा परवाना दिला जातो.

स्क्रॅपच्या वाहनांतील किटचा वापर
मुंबई, ठाणे या शहरातील सीएनजी वाहनांचा अधिक वापर होत असल्याने मोठ्या प्रमाणात वाहने स्क्रॅपमध्ये काढली जातात. परिणामी येथील सीएनजी किटचा वापर अवैधरीत्या केला जात आहे.

वाहनांमध्ये गॅस भरताना पंपचालक वाहनांतील प्लेट पाहतात. त्यावर वैधतेची तारीख लिहिलेली असते. बर्‍याचदा तारीख निघून गेल्यावरही पंपचालक वीस ते तीस रुपये अधिक घेऊन गॅस भरून देत असल्याची माहिती समोर आली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news