

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : शालेय पोषण आहारातील त्रुटींविषयी पाच शाळांनी महापालिका शिक्षण विभागाकडे तक्रारी केल्या होत्या. त्याची दखल घेऊन पोषण आहार देणार्या एका पुरवठादार संस्थेला नोटीस बजावण्यात आली आहे, अशी माहिती शिक्षण विभागाचे उपायुक्त संदीप खोत यांनी दिली. महापालिकेची चिंचवड स्टेशन येथील मराठी तसेच उर्दू माध्यमाची शाळा, मोहननगर येथील मुले व मुली यांची प्रत्येकी एक शाळा आणि कस्पटे वस्ती (वाकड) येथील एक शाळा यांनी याबाबत शिक्षण विभागाकडे 18 ऑगस्टला तक्रार केली होती.
या तक्रारीला अनुसरून शिक्षण विभागाने सावित्री महिला स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्थेला नोटीस बजावली आहे.
संबंधित संस्थेकडून पुरविण्यात आलेल्या वरणभाताला चव नव्हती. वरण पातळ होते. तसेच, विद्यार्थ्यांना आठवड्यातून एकदा द्यावयाचा पूरक आहार संबंधित संस्थेकडून नियमित पाठविला जात नाही, अशी शाळांची तक्रार होती. दरम्यान, सध्या महागाई वाढली असताना शासनाकडून जुन्याच दराने पोषण आहारासाठी निधी दिला जात आहे. हा दर वाढवून देणे गरजेचे आहे, असे पुरवठादार संस्थांचे म्हणणे आहे.