

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : राज्य सरकारच्या शिक्षण विभागाने केलेल्या सूचनेनुसार महापालिका शिक्षण विभागाकडून शहरामध्ये 'मिशन झिरो ड्रॉपआऊट' अभियान राबविण्यात येणार आहे. येत्या मंगळवारपासून (दि. 5) या अभियानाला सुरुवात होणार आहे. 20 तारखेपर्यंत हे अभियान चालणार आहे. या अभियानात 6 ते 14 वयोगटातील शाळाबाह्य मुलांचा शोध घेऊन त्यांना प्राथमिक शाळेत दाखल करून घेतले जाणार आहे.
या सर्वेक्षणात शहरातील सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनाच्या शाळांनी सहभागी व्हायचे आहे. त्यासाठी शाळा स्तरावर मुख्याध्यापकांनी समिती स्थापन करायची आहे. या समितीने शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणाचे नियोजन करायचे आहे. सर्वेक्षणात विद्यार्थ्यांचे नाव, पालकांचे नाव, वयोगट, कोणत्या वर्गापर्यंत विद्यार्थ्यांचे शिक्षण झाले आहे अथवा शिक्षणच झालेले नाही, या बाबींची पडताळणी केली जाणार आहे. सर्वेक्षणात शोध घेतलेल्या मुलांना शाळेत दाखल करून घेण्याची प्रक्रिया मुख्याध्यापकांनी करायची आहे.
शाळाबाह्य मुलांचा शोध घेतल्यानंतर त्या मुलांच्या पालकांचे प्रबोधन करुन मुलांना शाळेत दाखल करुन घेण्याची कार्यवाही केली जाणार आहे. त्यासाठी गरज पडल्यास पालकांच्या गृहभेटी देखील घेतल्या जाणार आहे. महापालिका शिक्षण विभागाचे अधिकारी, पर्यवेक्षक, समग्र शिक्षा अभियायानाचे विषयतज्ज्ञ हे नियोजन आणि माहिती संकलन करणार आहे.
यापूर्वी डिसेंबर 2021 ते फेब्रुवारी 2022 या कालावधीत शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण झालेले आहे. सर्वेक्षणात 6 ते 10 वयोगटातील एकूण 1023 मुले आढळली. तर 11 ते 14 वयोगटातील 84 मुले आढळली आहेत. शाळाबाह्य मुलांचा कोठे शोध घेणार?
एसटी स्टँण्ड, शाळेच्या आजूबाजूच्या वस्त्या, रेल्वे स्थानक, इमारतींचे बांधकाम, शहरातील विविध चौक, बसथांबे आदी ठिकाणी शाळाबाह्य मुलांचा शोध घेतला जाणार आहे.
सर्वेक्षणात या मुद्द्यांवर भर
शहर हद्दीतून स्थलांतरित झालेल्या मुलांची आकडेवारी संकलित करणे
अन्य शहरातून पिंपरी-चिंचवडमध्ये आलेल्या मुलांचे सर्वेक्षण करणे
शाळामध्येच सोडणारी मुले, शाळेतच न गेलेली मुले यांचा शोध घेणे
राज्य सरकारच्या 'मिशन झिरो ड्रॉपआऊट' अभियानानुसार शहरात कार्यवाही केली जाणार आहे. 5 ते 20 तारखेदरम्यान हे अभियान राबवुन शाळाबाह्य मुलांना शाळेत दाखल करुन घेतले जाणार आहे.
– संजय नाईकडे, प्रशासन अधिकारी, शिक्षण विभाग, महापालिका.