

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : महानगरपालिकेच्या पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाच्या पाचव्या मजल्यावरील 502 क्रमांकाच्या वॉर्डमध्ये सायंकाळी 4 च्या सुमारास अचानक आग लागली… आपत्कालीन व्यवस्थापन पथकाने तत्काळ समन्वय साधून सर्व संबंधित यंत्रणांना सूचना दिल्या… अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले… या वॉर्डमध्ये दाखल झालेल्या रुग्णांना तत्काळ सुरक्षित स्थळी हलवले गेले… रुग्णालयात लागलेल्या या आगीवर नियंत्रण मिळताच सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
आग लागली, आग लागली, पण घाबरण्याचे कारण नाही. हे होते मॉकड्रिल! यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयामध्ये आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी उपलब्ध यंत्रणांमधील समन्वय, बचाव कार्यवाहीबद्दल माहिती व्हावी या उद्देशाने मॉकड्रिल या वेळी घेण्यात आले. अग्निशमन दल, पोलिस, सुरक्षा दल, रुग्णालयातील अधिकारी कर्मचारी या मॉकड्रीलमध्ये सहभागी झाले होते. अग्निशमन दलाचे 3 बंब, 2 फायर फायटर मोटार बाईक, 3 रुग्णवाहिका यांचा वापर या मॉकड्रीलमध्ये करण्यात आला.
रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे, मुख्य अग्निशमन अधिकारी किरण गावडे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, जनता संपर्क अधिकारी किरण गायकवाड, सहयोगी प्रा. डॉ. मुकेश बावा, डॉ. अनिकेत लाठी, डॉ. अतुल देसले, डॉ. महेश असलकर, डॉ. मनजित संत्रे, डॉ. कौस्तुभ कहाणे, डॉ. रितेश पाठक, डॉ, सचिन देवरुखकर, डॉ. पांडुरंग थाटकर, सहायक सुरक्षा अधिकारी संदीप बहिवाल यांच्या मार्गदर्शनाखाली मॉकड्रील आयोजित केले.
मॉकड्रिलदरम्यान वायसीएम रुग्णालयातील अधिकारी, नर्सिंग स्टाफ, कर्मचारी यांनी त्यांची जबाबदारी योग्यरीत्या पार पाडली. संकटकालीन बचाव प्रशिक्षणसाठी फायर पंप ऑपरेटर, पाणीपुरवठा मदत पथक, बायो मेडिकल सपोर्ट पथक, बाह्य अग्निाशमन केंद्र पथक, आरोग्य पथक, रक्तपेढी मदत पथक, फायर लायसन्स एजंसी, माहिती व जनसंपर्क पथक, रुग्ण हाताळणी पथक, प्रसारमाध्यम व्यवस्थापन पथक, रुग्णवाहिका दळणवळण पथक, वैद्यकीय मदत पथक, विद्युत, स्थापत्य, रुग्णालय अंतर्गत अग्निशामक पथक, रुग्ण निर्वासन पथक, पोलिस मदत पथक यांच्यात समन्वय साधून फायर मॉकड्रिल यशस्वीपणे पार पाडले.