

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : डोक्यात कठीण वस्तूने प्रहार करून वडिलानेच मुलाचा खून केला. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास जुना जकात नाका मोशी येथे ही घटना घडली. यातील विशेष बाब म्हणजे खून केल्यानंतर बापानेच पोलिसांना खून करून माहिती दिली
युवराज अशोक सावले (22, रा.मोशी) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी वडील अशोक सावले (47) यांना पोलिसांनी अटक केली आहे.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रदीप पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अशोक सावले याचे गॅरेज आहे. युवराज सावले हा त्याचा मुलगा असून तो काही कामधंदा करत नव्हता. तसेच, युवराज नेहमी किरकोळ कारणावरून वाद घालून आई-बापाला आणि भावाला मारहाण करायचा.
दरम्यान, गुरूवारी रात्री युवराज याने घरी आल्यानंतर पुन्हा भांडण करण्यास सुरुवात केली. त्यावेळी आईला व भावाला मारहाण करून घराबाहेर काढले. त्यानंतर दरवाजा बंद करून आरोपी बापाला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यावेळी चिडलेल्या बापाने कठीण वस्तूने डोक्यात घाव घातला.
यामुळे युवराज जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडला. त्यानंतर बापाने स्वतः पोलिस नियंत्रण कक्षाला फोन करून याबाबत माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत युवराजला रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे जाहीर केले. एमआयडीसी भोसरी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरु आहे.