पिंपरी : मुंडी छाटून टाकण्याची रावण गँगकडून धमकी

पिंपरी : मुंडी छाटून टाकण्याची रावण गँगकडून धमकी

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा :  'मी या भागाचा भाई आहे, कोणालाही विचार रावण कोण आहे, रावण गँग काय आहे. इथे राहाल तर मुंडी छाटून टाकेन, अशी धमकी देत सहा जणांनी परिसरात दहशत माजवली.' ही घटना 12 आण 24 जून रोजी गुलिस्ताननगर, कासारवाडी येथे घडली.

सर्फराजताज शेख उर्फ रावण (वय 25), शहाबाज ताज शेख (वय 23), अरबाजताज शेख (वय 22), जोहल ताज शेख (वय 20), नवाजताज शेख (वय 19), महिला (48, सर्व रा. गुलिस्ताननगर, कासारवाडी) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी समशेर आलम बशीर शेख (49, रा. गुलिस्ताननगर, कासारवाडी) यांनी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी 12 जून रोजी रात्री साडेआठच्या सुमारास फिर्यादी राहात असलेल्या इमारतीत आले. दरम्यान, इमारतीमधील दुसर्‍या आणि तिसर्‍या मजल्यावरील रूमचा आरोपींना कुलूप तोडून कब्जा केला. फिर्यादी यांनी आरोपींना प्रतिकार केला असता आरोपींनी ही इमारत आमच्या मालकीची आहे.

तुम्ही आमच्या परस्पर इथे राहू शकत नाही, असे फिर्यादी यांनी समजावून सांगितले. त्यावर आरोपी सर्फराज आणि शहाबाज यांनी फिर्यादीस तलवार दाखवून, तू मला ओळखत नाही. या परिसराचा मी भाई आहे. कोणालाही विचार रावण कोण आहे, रावण गँग काय आहे. इथे राहिलास तर मुंडी छाटून टाकेन, अशी धमकी दिली.

तसेच, फिर्यादी यांच्या गळ्याला आरोपींनी तलवार लावली. त्यानंतर 24 जून रोजी आरोपींनी फिर्यादी यांना घराजवळ अडवले. तू ज्या खोलीत राहतो, ती खोली खाली कर. नाहीतर तुझे मुंडके छाटून टाकेन, अशी धमकी दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे. भोसरी पोलिस तपास करीत आहेत.

logo
Pudhari News
pudhari.news