पिंपरी : महिलेचा खून करणारा अँटी गुंडा स्क्वॉडच्या जाळ्यात

पिंपरी : महिलेचा खून करणारा अँटी गुंडा स्क्वॉडच्या जाळ्यात

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : कपड्याच्या दुकानात घुसूम महिलेचा गळा चिरणार्‍या आरोपीच्या अँटी गुंडा स्क्वॉडने मुसक्या आवळल्या. ही घटना 16 ऑगस्ट रोजी सकाळी सव्वादहाच्या सुमारास लांडेवाडी, भोसरी येथे घडली होती. पैशासाठी महिलेचा खून केल्याची कबुली आरोपीने दिली आहे. रामकिशन शंकर शिंदे (24, रा. कारेगाव, ता. शिरूर, जि. पुणे. मूळ रा. हिंगोली) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पूजा ब्रिजकिशोर प्रसाद (31, रा. लांडगे आळी, भोसरी. मूळ रा. नवादा. ता. जि. मुजफ्फरपूर, बिहार) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी महिलेचे पती ब्रिजकिशोर शिवचंद्र प्रसाद (वय 38) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पूजा यांचे लांडेवाडी येथे कपड्यांचे दुकान आहे.

दरम्यान, 16 ऑगस्ट रोजी सकाळी पूजा यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे दुकान उघडले. दुकानात साफसफाईचे करीत असताना एकजण त्यांच्या दुकानात घुसला. काही कळण्याच्या आत त्याने पूजा यांच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार केले. यामध्ये गंभीर दुखापत झाल्याने पूजा यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. भोसरी पोलिसांसह गुन्हे शाखेची विविध पथके आरोपीचा शोध घेत होती. दरम्यान, अँटी गुंडा स्कॉडने सलग दहा दिवस परिसरातील सुमारे 250 सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. त्यावेळी रांजणगाव येथे ब्युटी पार्लर चालवणार्‍या महिलेचा मोबाईल फोन आणि रोख रक्कम चोरुन नेणारा आरोपी आणि पूजा यांचा खून करणारा आरोपी एकच असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी आरोपीची माहिती काढून कारेगाव परिसरात सापळा लावून रामकिशन याला अटक केली.

आरोपी रामकिशन याने पैशांची आवश्यकता असल्याने हा खून केल्याचे पोलिसांना सांगितले. त्याच्या विरोधात यापूर्वी ठाणे शहर मधील कोळसेवाडी पोलिस ठाण्यात तीन गुन्हे दाखल आहेत. आरोपीला भोसरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पोलिस उपायुक्त काकासाहेब डोळे, सहायक आयुक्त प्रशांत अमृतकर, सहायक पोलिस निरीक्षक हरीष माने यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news