

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड महापालिकेत एकूण आठ उपायुक्त आहेत. मात्र, पालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर केवळ तीनच उपायुक्तांचे छायाचित्र व संपर्क क्रमांक उपलब्ध आहे. उर्वरित पाच उपायुक्त पालिकेत कार्यरत नसल्याचे संकेतस्थळावरून स्पष्ट होत आहे. त्यांची माहिती का लपविली, अशी शंका उपस्थित केली जात आहे.
पालिकेत सुभाष इंगळे, स्मिता झगडे, अजय चारठाणकर, चंद्रकांत इंदलकर, मनोज लोणकर, संदीप खोत, विठ्ठल जोशी, सचिन ढोले हे आठ उपायुक्त आहेत. त्यातील इंगळे, झगडे, चारठाणकर, जोशी व ढोले हे 5 उपायुक्त राज्य शासनाकडून प्रतिनियुक्तीवर नियुक्त केलेले आहेत. इंदलकर, लोणकर व खोत हे तीन उपायुक्त हे पालिका आस्थापनेतील आहेत.
तसेच, शासन नियुक्तीवरील सहायक आयुक्त रविकिरण घोडके यांची उपायुक्त म्हणून नुकतीच पदोन्नती झाली आहे. त्यामुळे शासनाकडील उपायुक्तांची संख्या 6 झाली आहे. आकृतीबंधात उपायुक्तांच्या 10 पदांना मंजुरी आहे. त्यातील प्रत्येकी 5 पदे पालिका आस्थापना व शासन नियुक्तीच्या अधिकार्यांसाठी आहे.
पालिकेच्या संकेतस्थळावर आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, सहआयुक्त व उपायुक्त यांचे छायाचित्र, त्यांच्याकडील विभाग व संपर्क क्रमांक आदी माहिती देण्यात आली आहे. तसेच, विभाग या शीर्षकात संबंधित अधिकार्यांची माहिती व छायाचित्र आहे.