पिंपरी : बांधकाम साहित्याचे दर वाढल्याने, घरे महागच !

पिंपरी : बांधकाम साहित्याचे दर वाढल्याने, घरे महागच !
Published on
Updated on

दीपेश सुराणा : 

पिंपरी : बांधकाम साहित्याच्या दरात सध्या सरासरी 10 ते 15 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. त्यामुळे बांधकाम खर्चात ही वाढ झाली. त्याशिवाय, जीएसटीतील वाढ, मनुष्यबळावरील वाढलेला खर्च, वाहतूक खर्च आदी विविध कारणांमुळे घरांच्या किमतीमध्ये 5 ते 12 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. स्टीलच्या किमती गेल्या साडेचार महिन्यांत जवळपास सरासरी 25 टक्क्यांने घटल्या आहेत. मात्र, त्यामुळे घरांच्या किमती कमी झालेल्या नाही. गेल्या दहा वर्षांमध्ये घराच्या किमती 60 ते 100 टक्क्यांनी वाढल्या आहेत.

रशिया-युक्रेन युद्धामुळे निर्माण झालेल्या भीतीने मार्चअखेर स्टीलच्या किमती 72 हजार ते 85 हजार प्रति टनापर्यंत जाऊन पोहचल्या होत्या. गेल्या साडेचार महिन्यात जवळपास 25 टक्क्याने या किमती कमी झाल्या आहेत. सध्या 50 हजार ते 68 हजार प्रति टन असे स्टीलचे दर सुरू आहेत. वेगवेगळ्या ब्रॅण्डनुसार स्टीलच्या किमती कमी-अधिक आहेत. गेल्या वर्षभरापूर्वी मार्च 2021 आधी प्रति टन स्टीलची किंमत 40 ते 45 हजार दरम्यान होती.

बांधकाम खर्चाचे गणित
प्रति चौरस फुटासाठी सध्या 2 हजार ते 2 हजार 500 इतका बांधकाम खर्च लागत आहे. प्रति चौरस फुटामागे सरासरी 350 ते 400 इतकी बांधकाम खर्चात वाढ झाली आहे. शहरातील वेगवेगळ्या भागात जमिनीचे दर वेगवेगळे आहेत. सरासरी 2 ते 10 हजार रुपये प्रति चौरस फुटानुसार हा दर लागतो. त्यामुळे एका सदनिकेसाठी लागणारा खर्च क्षेत्रनिहाय वेगवेगळा येतो. शहरात सध्या सदनिकांचे प्रति चौरस फूट विक्री दर विभागनिहाय सरासरी 4 हजार ते 17 हजार चौरस फूट असे आहे. महापालिकेचे विकास शुल्क, अग्निशामक शुल्क, टीडीआर, झोपडपट्टी क्षेत्रातील टीडीआर आदींचाही भार विकसकावर पडतो.

बांधकाम खर्चात वाढ
सिमेंट, बांधकामाचे ब्लॉक्स, वीट, खडी, वाळू, प्लंबिंग मटेरियल आदींमध्ये सरासरी 17 ते 18 टक्क्यांपर्यंत वाढ झाली होती. काही प्रमाणात किमती नियंत्रणात आल्या. मात्र, अद्यापही 10 ते 15 टक्के किमती वाढलेल्याच आहेत. ठराविक बांधकाम साहित्यांच्या किमती तर 20 टक्क्यांपर्यंत वाढल्या आहेत. त्याशिवाय, बांधकाम साहित्याच्या वाहतूक खर्चातही वाढ झाली आहे. कामगारांच्या पगारावर होणारा खर्च वाढला आहे. या सर्वांचा परिणाम बांधकाम खर्च वाढण्यात झाला आहे.

स्टीलच्या किमती कमी झाल्या असल्या तरी बांधकाम साहित्याच्या किमती वाढलेल्याच आहेत. त्याशिवाय, वाहतूक खर्च, कामगारांचा पगार यावरील खर्च वाढला आहे. तसेच, जीएसटी, मुद्रांक शुल्क जास्त आहे. या सर्व बाबींमुळे घरांच्या किमती 5 ते 10 टक्क्याने वाढलेल्या आहेत. विकसकांना 'जीएसटी'मध्ये इनपुट क्रेडिट, मुद्रांक शुल्कात सवलत आणि बांधकाम साहित्याचे दर कमी झाल्यास घरांच्या किमती कमी होऊ शकतात.
                                            – संतोष कर्नावट, बांधकाम व्यावसायिक

बांधकाम साहित्याच्या किमतीमध्ये 17 ते 18 टक्क्यांपर्यंत वाढ झाली होती. या किमती जवळपास पाच टक्क्याने कमी झाल्या आहेत. बांधकाम साहित्याच्या दरवाढीने बांधकाम खर्चात प्रति चौरस फुटामागे 350 ते 400 रुपयांनी वाढ झाली आहे. बांधकामावरील 18 टक्के जीएसटी, मुद्रांक शुल्कातील रद्द केलेली सवलत आदी कारणेही घरांच्या किमती वाढण्यास कारणीभूत आहेत. सध्या घरांच्या किमती 10 ते 12 टक्क्याने वाढल्या आहेत. त्यामध्ये आणखी वाढ होऊ शकते.
                                                -शांतिलाल कटारिया, राष्ट्रीय उपाध्यक्ष, क्रेडाइ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news