

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : महावितरणकडून गेल्या दोन दिवसांपासून वीजपुरवठा खंडित होत असल्याने त्याचा परिणाम महापालिकेच्या पाणीपुरवठ्यावर होत आहे. गुरुवारी सलग दुसर्या दिवशी शहरातील पाणीपुरवठा अडीच तास विस्कळीत झाला होता. आज दुपारी 2ः15 ते 3ः45 दरम्यान रावेत जलउपसा केंद्र येथील वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे पंपिंग बंद पडल्याने रावेत येथून होणारा पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. जवळपास दीड तास हा वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यानंतर पंपिंग होऊन निगडी येथील जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पाणी पोहोचण्यास एक तासाचा कालावधी लागला. त्यामुळे त्याचा परिणाम सायंकाळच्या पाणीपुरवठ्यावर झाला. शहरात सायंकाळी होणारा पाणीपुरवठा त्यामुळे विस्कळीत झाला.
सकाळच्या पुरवठ्यावरही परिणाम
शहरात बुधवारी (दि. 31 ऑगस्ट) सकाळी पाऊण तास आणि सायंकाळी पाऊण तास रावेत जलउपसा केंद्र येथील वीजपुरवठा खंडित झाला. दोन्ही वेळेला पंपिंग होऊन पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी प्रत्येकी एक तास लागला. त्यामुळे दिवसभरात जवळपास साडेतीन तास पाणीपुरवठा विस्कळीत झाला. बुधवारी झालेल्या खंडित वीजपुरवठ्यामुळे शहरात गुरुवारी सकाळी होणारा पाणीपुरवठाही कमी दाबाने झाला. पेठ क्रमांक 10 येथील पंपहाऊसचा वीजपुरवठा दुपारी दीड वाजता खंडित झाला. येथील तांत्रिक बिघाड शोधून वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे काम महावितरणकडून रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
रावेत जलउपसा केंद्र येथे आज दुपारी दीड तास वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे सायंकाळचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला. तर, बुधवारी खंडित झालेल्या वीजपुरवठ्यामुळे सकाळचा पाणीपुरवठाही विस्कळीत झाला. पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
– श्रीकांत सवणे, सह-शहर अभियंता (पाणीपुरवठा), महापालिका.पेठ क्रमांक 7 व 10 या परिसरासाठी असलेल्या पंप हाऊसचा वीजपुरवठा दुपारी दीड वाजता खंडित झाला. तसेच, येथे निर्माण झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे त्याचा पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला. त्याशिवाय, रावेत येथील खंडित वीजवितरणामुळे शहराच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होत आहे. याबाबत कायमस्वरुपी उपाययोजना करण्यात यावी.
-सीमा सावळे, माजी नगरसेविका.