

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : चिंचवडगाव येथील चापेकर चौकातील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने रविवारी(दि. 17) रोजी दु. दीड वा. च्या सुमारास आगीची दुर्घटना घडली होती. मात्र अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ आग विझवल्याने मोठी दुर्घटना टळली. शाळेतील कंम्प्युटर रूममध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने आजूबाजुला असलेले साहित्य जळून खाक झाले होते.
शाळेच्या खिडकीतून आगीचे लोट बाहेर येत असल्याने नागरिकांनी अग्निशमन दलाशी संपर्क साधला. तत्काळ महापालिकेचे अग्निशमन दलाचे दोन बंब घटना स्थळावर दाखल झाले. अग्निशमन दलाने केलेल्या प्रयत्नामुळे आग लवकरच आटोक्यात आली. परिणामी होणारी मोठी दुर्घटना टळल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.