पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड शहरातील पथविक्रेत्यांसाठी शिस्त लागणे गरजेचे आहे. महापालिका त्यांना जाणूनबुजून त्रास देत नाही. मी स्वतः पाव तसेच भाजी विकली आहे. शहरातील विविध ठिकाणी हॉकर झोन करून त्यांना कायमस्वरूपी जागा देणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन आयुक्त राजेश पाटील यांनी बुधवारी (दि.17) यांनी केले. महापालिका व महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघातर्फे निगडी येथील उड्डाणपुलाखाली खाऊ गल्ली सुरू करण्यात आली आहे. त्याचे उद्घाटन आयुक्त पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, क्षेत्रीय अधिकारी सीताराम बहुरे, शीतल वाकडे, कार्यकारी अभियंता बापू गायकवाड, महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते, वाहतूक पोलिस निरीक्षक विजया कारंडे, पदाधिकारी व विक्रेते उपस्थित होते.
आयुक्त पाटील म्हणाले की, शहराच्या विकास होत असताना शहरामध्ये दर वर्षाला एक लाख लोकसंख्या वाढत आहे. त्याप्रमाणे नियोजन होणे गरजेचे आहे. शहरातील विविध ठिकाणच्या विक्रेत्यांसाठी आठवडे बाजार, भाजी मार्केट, खाऊ गल्ली, असे विविध विक्री केंद्र होणे गरजेचे आहे. या खाऊ गल्लीत ग्राहकांना निवांत बसून खाण्याचा आनंद घेता येणार आहे. नखाते म्हणाले की, फेरीवाला हा पुरातन काळापासूनचा घटक आहे. गावाचे शहर झाले.
शहरात फेरीवाल्यांना अडचण समजू नका. शहराच्या विकास आराखड्यामध्ये फेरीवाल्यांना सामावून घ्यावे. शहरात विविध 20 ठिकाणी हॉकर्स झोन सुरू होत आहेत. कार्यक्रम यशस्वीतेसाठी फरीद शेख, अंबालाल सुखवाल, मनोज यादव, विशाल मेहेर, काशीम तांबोळी, नदीम पठाण, नाना कसबे आदींनी परिश्रम केले. राजेंद्र वाकचौरे यांनी सूत्रसंचालन केले. माधुरी जलमुलवार यांनी आभार मानले.