

पिंपरी : प्रतिनिधी : शहरातील पर्यावरण व नदीसंवर्धनाच्या कामकाजासाठी महापालिकेच्या वतीने तृतीयपंथींचा समावेश असलेल्या नदी सुरक्षा पथकाची स्थापना करण्यात येणार आहे. या माध्यमातून नदीकाठ व मोकळ्या जागेत राडारोडा टाकण्यावर कारवाई केली जाणार आहे, असे आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी बुधवारी (दि. 10) सांगितले.
शहरातील पवना, इंद्रायणी व मुळा नदी आणि नाल्यांच्या काठावर तसेच, रस्त्याकडेने खासगी जागेत जागा मालकांद्वारे अनधिकृतपणे भराव टाकले जात आहेत. काही ठिकाणी मोकळ्या जागेत देखील भराव टाकल्याचे आढळले आहे. त्याला आळा घालण्यासाठी व दंडात्मक कारवाई करण्यासाठी पालिकेच्या वतीने नदी सुरक्षा पथक 15 ऑगस्टला स्थापन केले जाणार आहे. या पथकाच्या तीन तुकड्या निर्माण करण्यात येणार आहेत.
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त पालिकेने तृतीयपंथी पुनर्वसन कार्यक्रम हाती घेतला आहे. पालिकेच्या सुरक्षारक्षक, ग्रीन मार्शल पथकामध्ये त्यांचा समावेश केला आहे. आरोग्य व उद्यान विभागातील विविध कामकाजासाठी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
पालिकेच्या सार्वजनिक शौचालयांचे संचालन करण्यासाठी तृतीयपंथीयांच्या बचत गटांना प्राधान्य देण्यात आले आहे. समाज विकास विभागामार्फत शहरातील 50 वर्ष पूर्ण झालेल्या तृतीयपंथीयांना दरमहा पेन्शन आणि त्यांच्या बचत गटांना बळ देण्यासाठी अर्थसहाय्य योजना सुरु करण्यात आली आहे.