

वर्षा कांबळे : पिंपरी : जुलै महिन्यात मुसळधार पाऊस झाल्याने मावळातील धबधबे पर्यटकांना खुणावू लागले आहेत. यंदा कोरोनाचे कोणतेही निर्बंध नसल्याने पर्यटकांची तुफान गर्दी या पर्यटनस्थळी होत आहे. मात्र, काही अतिउत्साही पर्यटक धोकादायक ठिकाणी जाऊन सेल्फी काढत असल्यामुळे अपघात होत आहेत. यंदा पावसाळा सुरू झाल्यापासून 8 जणांचा मृत्यू झाला आहे.
बेगडेवाडी येथील कुंडमळा याठिकाणी कुंडमाता देवी मंदिराजवळील बांधार्यात पाण्यात मनसोक्त भिजण्यासाठी आणि रांजणखळग्यांसह सेल्फी काढण्यासाठी पर्यटक येतात. याठिकाणी रांजणखळग्यात पाण्याचा अंदाज न लागल्याने पाण्यात पाय घसरून पडल्यानंतर बाहेर येता येत नाही.
पाण्याच्या भोवर्यात अडकल्यानंतर वाचण्याची शक्यता कमी असते. भोवरे मोठे असल्याने मृतदेह शोधण्यासाठी जीवरक्षक व पोलिसांना अनेेक अडथळे येतात. याठिकाणी नुकतीच एक मुलगी वाहून गेली आहे. अद्याप तिचा शोध लागला नाही. तर, एका मुलाला वाचविण्यात यश आले आहे.
भुशी डॅमजवळ सेल्फी काढणे धोकादायक
लोणावळ्यातील लोहगड, राजमाची, कातळधारा धबधबा, भुशी डॅम या प्रसिद्ध ठिकाणी पर्यटकांची गर्दी असते. अनेक तरुण-तरुणी याठिकाणी ट्रेकिंग आणि धबधब्यांमध्ये भिजण्याचा आनंद घेण्यासाठी येतात. काही जण ट्रेकिंगसाठी इंटरनेटवरून माहिती घेतात आणि रस्ता चुकतात. तसेच धबधब्यांमध्ये वाहून जाण्याच्या, पाय घसरून जखमी होण्याच्या घटनादेखील घडल्या आहेत.
रावेत बंधार्याच्या भिंती निसरड्या
मावळमधील मळवली, वडेश्वर, वाहनगाव, खांडी, डाहुली याठिकाणी मोठ्या प्रमाणात धबधबे आहेत. उंच डोंगररांगा आणि कड्यावरुन कोसळणारे धबधबे पर्यटकांचे आकर्षण आहे. दरवर्षी नवीन धबधब्यात भिजण्यासाठी पर्यटक वेगवेगळे पर्याय निवडतात. धबधब्याच्या ठिकाणी पाण्याच्या वेगाचा अंदाज न आल्याने पर्यटक वाहून जातात. सर्वांनाच लोणावळ्यासारख्या ठिकाणी जायला जमत नाही. त्यामुळे शहरातील रावेत बंधारा आणि केजुबाई बंधारा याठिकाणी तरुणांकडून धोकादायकरित्या सेल्फी आणि फोटोसेशन केले जाते. रावेत आणि केजुबाई बंधार्याच्या भिंतीवरुन पाणी जात असताना धोकादायकरित्या फोटोसेशन केले जाते. याठिकाणी पाण्याला वेग असून, भिंती घसरड्या झाल्याने पाय घसरून वाहून जाण्याची शक्यता आहे.