पिंपरी: ‘देहूरोड कॅन्टोन्मेंट’चा कचरा मोशीत टाकू देणार नाही; ग्रामस्थांचा निर्धार

मोशी कचरा डेपोत देहूरोड बोर्डाचा कचरा टाकण्यास विरोध दर्शविण्यात आला असून त्याबाबतचे निवेदन ग्रामस्थांनी आयुक्तांना दिले आहे.
मोशी कचरा डेपोत देहूरोड बोर्डाचा कचरा टाकण्यास विरोध दर्शविण्यात आला असून त्याबाबतचे निवेदन ग्रामस्थांनी आयुक्तांना दिले आहे.
Published on
Updated on

मोशी : पुढारी वृत्तसेवा

देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचा कचरा मोशीतील कचरा डेपोत टाकण्याचा निर्णय बोर्डाच्या बैठकीत नुकताच घेण्यात आला. या निर्णयाला मोशीकरांनी विरोध केला असून कचरा मोशीत टाकू देणार नाही, अशी आक्रमक भूमिका घेतली आहे.देहूरोड भागातील कचरा मोशी डेपोत आणण्याचा घाट कॅन्टोन्मेंट बोर्ड आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने घातलेला दिसून येत आहे.

याला मोशीकरांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. वास्तविक मोशी येथील कचरा डेपोवर अतिरिक्त ताण आला असताना शहरात इतरत्र कचरा डेपो उभारणे आवश्यक आहे. प्रभाग निहाय कचरा डेपो उभारून मोशी कचरा डेपोचा ताण कमी कसा होईल हे न पाहता शहराच्या बाहेरील कचरा मोशीत कशासाठी आणण्याचा घाट घातला जात आहे.

मोशीतील नागरिकांची दुर्गंधीतून मुक्तता करणे अपेक्षित आहे. आज मोशीतील कचरा डेपोमुळे परिसरातील नागरिक आरोग्याच्या समस्येने ग्रासले आहेत. मोशी कचरा डेपोमुळे मोशीत मोठे गृहप्रकल्प व इतर विकासात भर टाकणार्‍या गोष्टींवर मोठा परिणाम होत आहे. दोन वर्षांपूर्वी देखील पुणे महापालिकेचा कचरा मोशीतील डेपोत आणण्याचा घाट घातला होता.

त्याला मोशी ग्रामस्थ व सर्व पक्षीयांनी विरोध केला होता. गाव बंद आंदोलन करून याचा विरोध केला होता तेव्हा ग्रामस्थांच्या एकीपुढे प्रशासनाला माघार घ्यावी लागली होती. देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या निर्णयाला महापालिका प्रशासनाने मान्यता देऊ नये, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे. मोशी ग्रामस्थ व नागरिकांवर होणारा अन्याय सहन केला जाणार नाही.

या विरोधात पूर्वीपेक्षाही अधिक तीव्र आंदोलन करण्यात येईल, असे निवेदन आयुक्त राजेश पाटील यांना देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष अजित गव्हाणे, माजी नगरसेवक धनंजय आल्हाट, राष्ट्रवादीच्या महिला शहराध्यक्षा कविता आल्हाट, संतोष बोराटे, मोरेश्वर आल्हाट, ज्ञानेश्वर बोर्‍हाडे उपस्थित होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news