पिंपरी: दृष्टिहीनतेवर मात करत ऋषिकेशचं ‘डोळस यश’

पिंपरी: दृष्टिहीनतेवर मात करत ऋषिकेशचं ‘डोळस यश’

पिंपरी : भोसरी येथील अंध शाळेतील विद्यार्थी ऋषिकेश वाघमारे याने मेहनत आणि जिद्दीने अभ्यास करीत यशाचे शिखर गाठले आहे. दहावीच्या परीक्षेत ऋषिकेशने 75.50 टक्के गुण प्राप्त केले आहेत. आजही दृष्टिहीन विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी ब्रेललिपीतील पुस्तके मिळत नाहीत. त्यामुळे श्रवण माध्यमातून त्यांना परीक्षेचा अभ्यास करावा लागतो.

गेली दोन वर्षे शाळा ऑनलाइन होत्या. यामध्ये सर्वसामान्य मुलांपेक्षा दिव्यांग मुलांना अप्रत्यक्ष शिकण्यात मोठ्या अडचणी निर्माण झाल्या होत्या. या अडचणींवर मात करत ऋुषकेशेने हे यश मिळविले. ऋषिकेश बोराटेवस्ती याठिकाणी राहतो. त्याचे आई-वडील शेती करतात. त्याने मिळविलेल्या यशाबद्दल तो सांगतो की, ज्या पद्धतीने मी परीक्षा दिली. त्यानुसार मला गुण मिळालेले नाहीत.

मला मिळालेल्या गुणांबाबत मी असमाधानी आहे. आम्हाला रायटरच्या मदतीने पेपर लिहावाल लागतो. आम्ही सांगितलेले रायटरने योग्य पद्धतीने लिहिल्यास आम्हाला गुण चांगले मिळतात. रायटर चांगला मिळणे हे पण महत्त्वाचे असते. दोन वर्षे कोरोना असल्याने विद्यार्थ्यांना लिहिण्याची सवय राहिली नाही.

त्यामुळे कदाचित मला गुण कमी मिळाले असावेत, अशी खंत ऋषिकेशने व्यक्त केली. कोरोनाकाळात माझ्याकडे शिकण्यासाठी काहीही साधन नव्हते. नववीचे पूर्ण वर्षच वाया गेले. ऑनलाईन शैक्षणिक वर्षात कोणतीच सुविधा उपलब्ध नव्हती. वर्षाच्या शेवटी मला ब्रेल लिपीतील पुस्तके अभ्यासासाठी उपलब्ध झाली. मी दररोज सुमारे 14 ते 15 तास अभ्यास करत होतो. त्यामुळे मला आजचे हे यश मिळाले असल्याचे ऋषिकेश सांगतो. शासनाकडून दृष्टीहीन विद्यार्थ्यांसाठी योग्या त्या सुविधा मिळाल्यास दृष्टिहीन विद्यार्थ्यांच्या यशामध्ये आणखी भर पडेल अशी अपेक्षा त्याने या वेळी व्यक्त केली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news