पिंपरी : तांत्रिक अडचणींमुळे टायपिंगच्या परीक्षा केंद्रावर गोंधळ ; परीक्षार्थी आणि पालकांना नाहक त्रास

पिंपरी : तांत्रिक अडचणींमुळे टायपिंगच्या परीक्षा केंद्रावर गोंधळ ; परीक्षार्थी आणि पालकांना नाहक त्रास

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड शहरात महाराष्ट्र परीक्षा परिषदेच्या वतीने बुधवार (दि. 10) रोजी चिंचवड येथील प्रतिभा ज्युनिअर कॉलेज या सेंटरवर मराठी संगणक टायपिंग परीक्षेवेळी विद्यार्थ्यांना आलेल्या तांत्रिक अडचणींमुळे एकच गोंधळ उडाला. त्यामुळे परीक्षा केंद्रावरील विद्यार्थी आणि पालकांना नाहक त्रास सहन करावा लागला. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने मराठी, इंग्लिश कॉम्प्युटर टायपिंग परीक्षांचे आयोजन 25 जुलै ते 23 ऑगस्ट या कालावधित शहरातील प्रमुख सेंटरवर करण्यात आले.

चिंचवड येथील महाविद्यालयात मराठी टायपिंग श. प्र. मि. 30, ही परीक्षा चार वेगवेगळ्या सत्रांत घेण्यात आली. मात्र परीक्षेवेळी विद्यार्थ्यांना काही अडचणी आल्या. त्याचा परिणाम म्हणून परीक्षेतील पॅसेज पूर्ण होऊ शकले नाहीत. अशा तक्रारींसह बर्‍याच तक्रारी विद्यार्थ्यांनी केल्या.यामुळे विद्यार्थ्यांचे हे वर्ष वाया जाते की काय? अशी चिंता पालकांना लागली आहे. केंद्राबाहेर विद्यार्थी आणि पालकांनी केंद्र प्रमुखांना समस्यांचा पाढा वाचून दाखविला. यांवर परीक्षा परिषदेने परीक्षा पुन्हा घ्यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.

परीक्षेवेळी विद्यार्थ्यांना आलेल्या अडचणी

की-बोर्ड हार्ड व तुटलेले असून, काम करीत नव्हते
टाईप केलेला शब्द दिसत नव्हता 'करसर'बद्दल अचडण
स्क्रिन अ‍ॅटोमेटिक ऑफ होत होती सॉफ्टवेअर प्राब्लेम होते

परीक्षेतील स्टेटमेंट दिसत नव्हते. त्यामुळे पॅसेज टाईप करताना, वेळ लागत होता. अशा परिस्थितीत सात मिनीटात पॅसेज कसा संपणार? आता पुन्हा परीक्षा द्यावी लागणार याच टेन्शन आलय.
– श्रुती कांबळे, परीक्षार्थी.

ही अडचण सॉफ्टवेअरची असू शकते. आमच्याकडे परीक्षा होण्यापूर्वी संबंधित सॉफ्टवेअर टीमने याची पडताळणी केली आहे. आमची व्यवस्था चोख होती. कॉम्पुटरमध्ये कुठलीच अडचण नव्हती.
– वनिता कुर्‍हाडे, केंद्र प्रमुख, प्रतिभा महाविद्यालय.

सॉफ्टवेअरमध्ये काहीच अडचण नव्हती. आम्ही ज्या विद्यार्थ्यांनी तक्रार केली. त्यांचे बैठक क्रमांक घेऊन पडताळणी केली असता, काहींनी अर्धवट तर काहींनी दोन-तीन ओळी तर एकाने काहीच टाईप केलेले नाही. जर सॉफ्टवेअरमध्ये बिघाड असता तर, टाईपिंग करताच आले नसते. आम्ही विद्यार्थी, केंद्रप्रमुखांसमोर विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा घेऊन सॉफ्टवेअरची पडताळणी घेण्यास तयार आहोत.
– जयदीप साबळे, सॉफ्टवेअर मालक.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news