पिंपरी : ड्रोन कॅमेर्‍याद्वारे वारीच्या चित्रीकरणास बंदी

पिंपरी : ड्रोन कॅमेर्‍याद्वारे वारीच्या चित्रीकरणास बंदी
Published on
Updated on

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा :  आषाढी वारीचे 'ड्रोन' कॅमेर्‍याद्वारे चित्रीकरण करण्यास मनाई करण्यात आली आहे. पिंपरी- चिंचवडचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी शुक्रवारी (दि. 17) रात्री याबाबतचे आदेश दिले. याबाबत सविस्तर वृत्त असे की, 17 ते 22 जून दरम्यान जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज व संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांचा आळंदी व देहूगाव येथून पादुका प्रस्थान सोहळा संपन्न होणार आहे.

या सोहळ्याला आळंदी व देहूगाव येथे लाखो भाविक येतात. आषाढी वारीकरिता येणारे भाविक हे मुख्यतः ग्रामीण भागातील असून त्यांना ड्रोन कॅमेर्‍याविषयी माहिती नसते. त्यामुळे अचानक ड्रोनद्वारे चित्रीकरण सुरू झाल्यास भाविकांमध्ये अफवा पसरवून गडबड गोंधळ होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

तसेच, ड्रोन कॅमेर्‍यामुळे चेंगराचेंगरी होऊन दुर्घटना होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात ड्रोन कॅमेर्‍याने चित्रीकरण करण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच, छोटे व्यावसायिक पालखी मार्गावर आपली दुकाने थाटतात. त्यामुळे रस्ता अरुंद होऊन पालखी प्रस्थानादरम्यान अडचणी येतात.

या वेळी होणार्‍या गर्दीचा फायदा घेऊन गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक आपला हेतू साध्य करीत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे.
या पार्श्वभूमीवर आयुक्तलयाच्या हद्दीतील संपूर्ण पालखी मार्गावर हातगाडीवाले यांना प्रतिबंध केल्याचे आदेशात नमूद आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर भारतीय दंड विधान संहिता कलम 188 प्रमाणे कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news