पिंपरी : डिजिटलायझेशनमुळे पाकीटमारी संपली

पिंपरी : डिजिटलायझेशनमुळे पाकीटमारी संपली
Published on
Updated on

संतोष शिंदे :  पिंपरी : आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अलीकडे मोबाईलवरील अ‍ॅप्सचा वापर वाढला आहे. छोटे मोठे व्यावसायिकदेखील ऑनलाईन पैसे स्वीकारत आहेत. त्यामुळे अनेकांनी खिशात रोकड ठेवणे बंद केले आहे. याचाच चांगला परिणाम म्हणजे कित्येक वर्षांपासून पोलिसांची डोकेदुखी ठरत असलेली पाकिटमारी संपुष्टात येऊ लागली आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये मागील दीड वर्षात पाकीटमारीचा एकही गुन्हा दाखल झाला नाही. 'रिस्क' घेऊन पाकीट मारल्यानंतर हाती काहीच लागत नसल्याने पाकीटमारांनी हा धंदा सोडून दिल्याचे जाणकारांचे मत आहे. उद्योग नगरी अशी ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवडमध्ये मागील काळात पाकीटमारी ही एक मोठी समस्या होती. रेल्वे, बस स्थानक, सिनेमागृह, राजकीय सभा, पिंपरीतील भाजी मंडई, मोठ्या बाजारपेठा, अशा प्रमुख ठिकाणी चोरटे आपला हात साफ करीत होते.

यातूनच सन 2018 मध्ये तब्बल 19 जणांनी पोलिसात धाव घेऊन गुन्हा नोंदवल्याची पोलिस दप्तरी नोंद आहे. मात्र, दरम्यानच्या काळात शहरवासीय डिजिटल झाले आहेत. गरीब-श्रीमंत भेद मिटवून मोबाईल नावाचे यंत्र घराघरात जाऊन पोहचले आहे. कपाटाच्या लॉकरमध्ये असलेली गोपनीय कागदपत्र पीडीएफ स्वरूपात मोबाईलमध्ये आली. पाकिटात रोकड ठेवण्यापेक्षा मोबाईल अ‍ॅपद्वारे व्यवहार करण्याकडे नागरिकांचा कल वाढला आहे. याचा चांगला परिणाम म्हणजे पाकीटमारी हळूहळू संपुष्टात आली लागली आहे. मागील दीड वर्षात शहर परिसरात एकही गुन्हा दाखल नाही.

मास्टर स्ट्रोक
वाहन चोरीचा मात्र मास्टर स्ट्रोक बसल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. मागील सहा महिन्यात शहर परिसरातून 803 वाहने चोरट्यांनी पळवून नेली आहेत.

मोबाईल हिसकवण्याच्या घटना वाढल्या
पाकीट मारल्यानंतर हाती काहीच लागत नसल्याने चोरट्यांनी आता पाकीटमारी बंद केली आहे. मात्र, अलीकडे मोबाईल चोर्‍या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. पिंपरी- चिंचवडमध्ये मागील सहा महिन्यात 152 जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत. यातील बहुतांश जणांचे मोबाईल चोरट्यांनी हिसकावून नेले आहेत.

पाकीटमारीचा पिढीजात धंदा
पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या रेकॉर्डवर असलेल्या काही चोरट्यांचा पाकीटमारी हा पिढीजात धंदा होता. ब्लेड, कटर, चाकू आणि कात्रीच्या सहाय्याने हे चोरटे अलगत खिसा कापून पाकीट पळवत होते. मात्र, अलीकडे हे चोरटे भूमिगत झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. सन 2018 मध्ये आकुर्डी रेल्वे स्थानकाजवळ अकरा पाकीटमारांना रेल्वे पोलिसांनी पकडले होते.

पाकीटमारीच्या तक्रारी येत नसल्या तरीही रेकॉर्डवरच्या पाकीटमारांच्या हालचालीवर पोलिसांचे लक्ष आहे. काही पाकीटमार चोरट्यांचा इतर गुन्ह्यात सहभाग असल्याचे समोर आले आहे. डिजिटलायझेशनमुळे पाकीटमारी कमी झाली, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
-डॉ. प्रशांत अमृतकर,
सहायक पोलिस आयुक्त,
पिंपरी- चिंचवड.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news