पिंपरी-चिंचवडचा बारावीचा निकाल 94.64; यंदाही मुलींनीच मारली बाजी

निकाल जाहीर झाल्यानंतर जल्लोष करताना मुली.
निकाल जाहीर झाल्यानंतर जल्लोष करताना मुली.

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च 2022 मध्ये घेण्यात आलेल्या 12 वी बोर्डाच्या परीक्षेचा राज्याचा निकाल बुधवारी (दि. 8) रोजी ऑनलाइन जाहीर झाला. पिंपरी चिंचवड शहराचा निकाल 94.64 टक्के लागला आहे. शहराचा गेल्या वर्षी मूल्यमापन कार्यपद्धतीनुसार जाहीर केलेला परीक्षेचा निकाल 99. 86 टक्के इतका लागला होता.

यंदा 4 मार्च ते 7 एप्रिल या कालावधीत बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा ऑफलाइन घेण्यात आली होती. परीक्षेसाठी प्रविष्ठ झालेल्या 17 हजार 796 विद्यार्थ्यांपैकी 17 हजार 704 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यामध्ये 16 हजार 756 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यात उत्तीर्ण झालेल्या मुलींची संख्या 7 हजार 761 असून मुलांची संख्या 8 हजार 995 एवढी आहे. मुलींचा निकाल 95.42 टक्के इतका आहे. मुलांचा निकाल 93.98 इतका आहे. तर निकालात यावेळीही मुलींनी आघाडी घेतली आहे.

मावळचा निकाल 90.56 टक्के
मावळ तालुक्याचा निकाल टक्के 90.56 टक्के लागला आहे. या वर्षी मावळमधील 4 हजार 69 विद्यार्थी परीक्षेस बसले होते. यापैकी 3 हजार 668 मुले – मुली उत्तीर्ण झाली. यामध्ये 1 हजार 892 मुले व 1 हजार 776 मुली होत्या. मुलींचा निकाल 92.88 टक्के तर इतका मुलांचा निकाल 88.49 टक्के आहे. मावळमध्ये देखील निकालात मुलींनीच बाजी मारली आहे.

निकाल दुपारी एक वाजता जाहीर झाला. त्यामुळे आता स्मार्टफोनच्या जमान्यात मोबाईलवर ऑनलाइन निकाल पाहण्यास विद्यार्थ्यांची
धाकधुक वाढली होती. तर काहींनी कॉलेजमध्ये जावून निकाल पाहून प्रिंट देखील घेतली. कारण कोरोनाकाळात ऑनलाइन शिक्षण घेताना येणार्‍या अडचणी आणि अर्ध्याच्यावर वर्ष संपल्यानंतर सुरू झालेले ऑफलाइन वर्ग यामुळे यावर्षी किती गुण मिळले असतील याविषयी विद्यार्थी आणि पालकांच्या चेहर्‍यावर चिंता दिसत होती.

दुपारी एक नंतर निकालाची साईट ओपन झाल्यावर विद्यार्थ्यांनी ऑनलाइन निकाल पाहिला आणि उत्तीर्ण झाल्याच्या आनंदात सुटकेचा नि:श्वास सोडला. कमी अधिक गुणांमुळे काही विद्यार्थ्यांमध्ये नाराजी होती. पण ज्यांना अपेक्षेपेक्षा गुण मिळाले त्यांनी जल्लोष केला. तर काहींनी झालो एकदाचे पास म्हणून जल्लोष केला. शिक्षक, पालक आणि नातेवाईकांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. व्हाट्सअपवर शुभेच्छांचा वर्षाव झाला.

मूकबधिर चिन्मयचे बारावीच्या परीक्षेत यश

शहरामध्ये मूकबधिर विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाची सोय नसल्याने शिक्षण घेणे अवघड झाले आहे. अशा व्यक्तींना उच्च शिक्षणासाठी पुणे याठिकाणीच सुविधा असल्यामुळे शिक्षणासाठी रोजच तारेवरची कसरत करावी लागते. तरीही शहरातील चिन्मय आवटे या विद्यार्थ्याने आपल्या कमतेरतेवर मात करत बारावीच्या परीक्षेत यश मिळविले आहे. निगडी येथे वास्तव्यास असलेल्या चिन्मय याने बारावीच्या परीक्षेत 71.17 टक्के गुण मिळविले आहे. पिंपरी चिचवडमध्ये निगडी प्राधिकरण याठिकाणी एकच मूकबधिर शाळा आहे. याठिकाणी इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत शिक्षण दिले जाते.

पुण्यातील टिंगरेनगरमधील सी.आर.रंगनाथन कर्णबधिर माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात चिन्मय शिक्षण घेत आहे. शहरातील सर्वच कर्णबधिर विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी पुण्याला जावे लागते. चिन्मय हा सर्वसामान्य घरातील मुलगा आहे. शहरात दहावीनंतरच्या शिक्षणाची सोय नसल्यामुळे पुण्यात इतक्या लांब शिक्षणासाठी प्रवास करण्यात वेळ जातो. सकाळी घर सोडले की यायला सायंकाळच होते. यामध्ये कोरोनामुळे ऑनलाइन शिक्षण यात सर्वसामान्य विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे अवघड होते. यामध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांचे काय असा प्रश्न पडतो. तरीदेखील कॉलेजमध्ये जे शिकविले त्यावर त्याने अभ्यास केला.

स्नेहवनमधील बारावीतील विद्यार्थ्यांचे यश

स्नेहवन सामाजिक संस्थेच्या विद्यार्थ्यांनी बारावी बोर्डाच्या परीक्षेत चांगले यश मिळवले आहे. यामध्ये बीड जिल्ह्यातील श्रीकांत लांबरूड – 80 टक्के, परभणी जिल्ह्यातील वैभव गोरे – 76 टक्के, दीपक मंगरुळकर 71टक्के गुण मिळवले आहे. स्नेहवनमधील बारावीच्या विद्यार्थ्यांची पहिली बॅच आहे. स्नेहवन ही संस्था गेली 6 वर्ष आत्महत्याग्रस्त शेतकरी, शेतमजूर, ऊसतोड कामगार यांच्या मुलांच्या शिक्षण व संगोपनाचे कार्य करते. स्नेहवनमधील 3 विद्यार्थ्यांनी बारावी बोर्डाच्या परीक्षेत चांगले गुण मिळवले आहेत. वडिलांचे छत्र नाही, कोणतीही शिकवणी नाही, मुलांनी यश संपादन केले, अशी माहिती संस्थापक अशोक देशमाने यांनी दिली.

चिंतामणी रात्र प्रशालेचा बारावीचा शंभर टक्के निकाल

चिंचवड स्टेशन येथील रात्र प्रशालेचा बारावी बोर्डाचा निकाल शंभर टक्के लागला. यामध्ये कृष्णा वाघमारे याने 60.17 टक्के गुण मिळवून प्रथम तर राम पवार याने 58.67 टक्के गुण मिळवून दुसरा क्रमांक मिळविला आहे. दिपाली पिल्लोलू या विद्यार्थिनीने 56.67 गुण मिळवून तिसरा क्रमांक मिळविला आहे. याबद्दल प्राचार्य दिलीप लंके यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news