

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी गावातील सर्व प्रमुख रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. तरीही महापालिका प्रशासन याकडे लक्ष देत नसल्याने नागरिक संताप व्यक्त करत आहेत. पिंपरी गावातून पिंपरी कॅम्पमध्ये जाण्यासाठी वैभवनगर रस्ता, अशोक थिएटर रस्ता तसेच तपोवन मंदिर रस्ता असे प्रमुख रस्ते आहेत. या तीनही रस्त्यांची चाळण झाली आहे. वैभवनगरकडून काळेवाडीकडे जाणार्या रस्त्यावर पवनेश्वर मंदिराजवळ, अशोक थिएटरकडे जाणार्या पावर हाऊस चौकात खड्ड्यांचे जणू पिंपरी गावातील रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे.
नवमहाराष्ट्र विद्यालयाच्या पाठीमागून पिंपळे सौदागरकडे जाणार्या रस्त्यावर तर मोठंमोठे खड्डे दिसत आहेत. याच रस्त्यावर मोकाट जनावरांचा उपद्रव वाढला असल्याने चालकांना वाहने चालवताना कसरत करावी लागत आहे. प्रशासन शहरातील अकराशे खड्ड्यांपैकी 846 खड्डे बुजविण्याचा दावा करत आहे. मात्र, एकट्या पिंपरी गावातच 300 हून अधिक खड्डे झाले आहेत. त्यामुळे महापालिका प्रशासनाने लवकरात लवकर परिसरातील खड्डे बुजविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.