

मिलिंद कांबळे
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील महापालिका व खासगी शाळेतील विद्यार्थ्यांची बॅटरी टेस्ट घेऊन त्यांच्यातील शारीरिक क्षमता हेरून, त्यांना एका विशिष्ट खेळासाठी निवडले जाईल. त्या विद्यार्थी-खेळाडूंना पालिकेतर्फे आंतरराष्ट्रीय दर्जाचे मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे. या माध्यमातून निर्माण झालेले खेळाडू पिंपरी-चिंचवडचे नाव जागतिक नकाशावर उंचावतील, अशी महापालिकेची अपेक्षा आहे. त्यादृष्टीने पावले प्रशासनाकडून टाकली जात आहेत.
शहरात पालिका व खासगी शाळांची संख्या 500च्यावर आहे. त्यात सुमारे दीड लाखांपेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. प्रत्येक शाळेत पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांची बॅटरी टेस्ट घेऊन खेळाडूची निवड केली जाणार आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांस संबंधित खेळाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यासंदर्भात प्राथमिक चर्चा झाली असून, त्यांचे नियोजन सुरू आहे. तसेच, ठराविक खेळांची निवड करून प्रशिक्षणासाठी ठिकाणे निश्चिती केली जाणार आहे, असे क्रीडा विभागाचे उपायुक्त विठ्ठल जोशी यांनी सांगितले.
सीईएममध्ये रोईंगचे प्रशिक्षण सुरू
लष्कराच्या दापोडी येथील सीएमईसोबत करार करून त्यांच्या नाशिक फाटा येथील सेंटरवर रोईंगचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यासाठी पालिका व खासगी शाळेच्या 15 खेळाडूंची निवड झाली आहे. आणखी 10 खेळाडू निवडले जाणार आहेत. त्यासंदर्भातील करार पालिकेने सीएमईसोबत केला आहे.
भोसरीत आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल
भोसरीच्या आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलात आंतरराष्ट्रीय अनुभवी प्रशिक्षण नियुक्त करून ऑलिम्पिक दर्जाचे खेळाडू निर्माण केले जाणार आहे. तेथे खेळाडूंची निवास व्यवस्था असणार आहे. तसेच, आहाराची व्यवस्था ही केली जाणार आहे.
सरावासाठी सात तलावांचे खासगीकरण
खेळाडूंना सरावासाठी तलाव उपलब्ध व्हावा म्हणून 14 पैकी 7 सार्वजनिक जलतरण तलाव पूर्णपणे खासगी संस्थेला चालविण्यास देण्यात येत आहेत. तेथील राष्ट्रीयस्तरावर खेळाडू प्रशिक्षण देणार आहेत. तलावाची देखभाल, दुरूस्ती व नियंत्रण संबंधित संस्था करणार आहे. त्याची निविदा लवकरच प्रसिद्ध केली जाणार आहे.
20 नोव्हेंबरला पिंपरी-चिंचवड आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन
पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनच्या धर्तीवर महापालिकेच्या वतीने पिंपरी-चिंचवड आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा 20 नोव्हेंबर 2022 ला आयोजित केली जाणार आहे. त्या 42.195 किलोमीटर अंतराच्या शर्यतीत जगातील विविध देशांचे धावपटू सहभागी होणार आहेत. ही स्पर्धा सलग 10 वर्षे घेतली जाणार असून, या स्पर्धेमुळे पिंपरी-चिंचवडचे नाव क्रीडा क्षेत्रात जागतिक पातळीवर पोहचणार आहे. स्पर्धेसाठी प्रीकॉम इंटरनॅशनल प्रा. लि. या एजन्सीला दरवर्षी 3 कोटी शुल्क दिले जाणार आहे.
महापौर चषक स्पर्धांना रोख
महापालिकेच्या वतीने दरवर्षी विविध खेळाच्या महापौर चषक क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या जातात. ती पद्धत बंद करून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मोजक्याच खेळांच्या स्पर्धा आयोजित करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे शहरातील नवोदित खेळाडूंना शहरात आंतरराष्ट्रीय स्पर्धेचा अनुभव घेता येणार आहे. त्यातून खेळाडू निर्मितीस चालना मिळणार आहे.
शहराला स्पोर्ट्स हबची नवीन ओळख देणार
पिंपरी-चिंचवडला स्पोर्ट्स हब अशी नवी ओळख निर्माण करण्यासाठी पावले उचलली जात आहेत. पालिकेच्या शहरात खेळाच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा, मैदान व स्टेडिमय आहेत. त्या ठिकाणी स्थानिक खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाचे मोफत प्रशिक्षण देण्यात
येणार आहे. तसेच, आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध खेळांच्या स्पर्धाचे आयोजन केले जाणार आहे. स्पोर्ट्स हबला प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपक्रम, योजना व नवनवीन संकल्पना राबविल्या जाणार आहेत, असे आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी सांगितले.