

पिंपरी : तू आमच्याकडे रागाने का बघितले, असे म्हणून चाकूने मारून दोन मुलांना गंभीर जखमी केले. तसेच, एकाला मारहाण करून जखमी केले. देहूरोड येथे मंगळवारी (दि. 14) सायंकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी 37 वर्षीय महिलेने बुधवारी (दि. 15) देहूरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
त्यानुसार, कार्तिक टाक, दोन अल्पवयीन मुले आणि इतर अज्ञातांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचा मुलगा आशिष व त्याचा मित्र तनुष टाक व रोहन हे नेहमीप्रमाणे मराठी शाळेच्या पटांगणात खेळत होते. त्यावेळी आरोपी तेथे आले. काल तू आमच्याकडे रागाने का बघितले, असे म्हणून आरोपींनी फिर्यादीचा मुलगा आशिष व तनुष याला चाकूने मारून गंभीर जखमी केले. तसेच रोहन याला मारहाण करून जखमी केले, असे फिर्यादीत नमूद आहे.