पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या त्रिसदस्यीय 46 प्रभागरचनेतील एकूण 139 जागांपैकी 114 जागांवर शुक्रवार (दि.29) आरक्षण सोडत काढण्यात आली. त्यानुसार नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या (ओबीसी) 37 आणि सर्वसाधारण खुल्या गटाच्या 77 जागा आरक्षण सोडतीमध्ये निश्चित झाल्या. ओबीसीच्या 19 आणि खुल्या गटात 38 महिलांना संधी मिळणार आहे. आपल्या हक्काची जागा महिलेसाठी राखीव झाल्याने अनेक दिग्गजांना धक्का बसला आहे. त्यांना इतर प्रभागात उडी घ्यावी लागेल किंवा कुटुंबातील महिला सदस्यास रिंगणात उतरवावे लागणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणासह निवडणूक घेण्यास परवानगी दिल्याने 27 टक्के आरक्षणानुसार महापालिकेत 37 जागा ओबीसींसाठी राखीव झाल्या. तर, 77 जागा खुल्या गटासाठी आहेत. त्याची आरक्षण सोडत शुक्रवार (दि.29) चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात काढण्यात आली. या वेळी आयुक्त राजेश पाटील, अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, उपायुक्त विठ्ठल जोशी, सचिन ढोले, सहायक आयुक्त प्रशांत जोशी, सहशहर अभियंता प्रमोद ओंबासे तसेच, विविध पक्षाचे पदाधिकारी, माजी नगरसेवक व कार्यकर्ते उपस्थित होते. निवडणूक विभागाचे सहायक आयुक्त बाळासाहेब खांडेकर यांनी नियोजन केले. सोडतप्रसंगी प्रेक्षागृहातील अर्ध्यापेक्षा अधिक खुर्च्या रिकाम्या होत्या.
अनुसूचित जाती (एससी)च्या 22 जागांपैकी 11 अनुसूचित जमातीच्या (एसटी) असा एकूण 25 जागा वगळून उर्वरित 114 जागेतून प्रथम ओबीसीच्या 37 जागा निश्चित करण्यात आल्या. आरक्षण चिठ्ठी काढण्याची कार्यपद्धती व नियमाबाबत अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांनी माहिती दिली. उपायुक्त विठ्ठल जोशी यांनी निवेदन केले. पारदर्शक काचेच्या ड्रममध्ये चिठ्ठ्या टाकून त्या मिसळण्यात आल्या. विद्यार्थ्यांनी त्यातून एक एक चिठ्ठी काढली.
प्रभाग क्रमांक 41ची चिठ्ठी बाहेर काढली
पिंपळे गुरव, वैदूवस्ती, जवळकर नगर, लक्ष्मीनगर प्रभाग क्रमांक 41 मध्ये एसटी महिला व एससी महिला असे आरक्षण पूर्वीच पडले आहे. त्यात खुल्या गटातील महिलांची चिठ्ठी काढताना प्रभाग 41 ची चिठ्ठीही ड्रममध्ये टाकण्यात आली. त्यावर एका नागरिकाने आपेक्ष घेतला. दोन जागेवर महिलांचे आरक्षण असताना उर्वरित एकमेव शिल्लक जागेवर आरक्षण का टाकले जात आहे, असा प्रश्न त्याने केला. त्यावर अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांनी नियमाचे वाचन करून प्रभाग 41 ची चिठ्ठी काढण्याचे आदेश कर्मचार्यास दिले आणि ती चिठ्ठी बाहेर काढण्यात आली. त्यामुळे प्रभागातील क जागा सर्वसाधारण गटासाठी झाली.
ओबीसी सोडत अशी झाली
प्रथम ओबीसीच्या जागा 37 जागा निश्चित करण्यात आल्या. महिला आरक्षण नसलेल्या 16, 17, 22, 25, 38, 39 व 46 या प्रभागातील 7 जागा ओबीसी महिलांसाठी थेट पद्धतीने निश्चित करण्यात आल्या. उर्वरित 12 जागांसाठी विद्यार्थ्यांच्या हस्ते चिठ्ठया काढण्यात आल्या. त्यात 30, 33, 10, 15, 40, 7, 9, 12, 8, 28, 4, 13 या प्रभागातील जागा ओबीसी महिलांसाठी राखीव झाल्या.
खुल्या गटातील महिला सोडत
सर्वसाधारण गटांच्या थेट पद्धतीने प्रभाग क्रमांक 1,2,3,5,6,21,23,26,27,29,31,32,36,42,45 या 15 जागा महिलांसाठी आरक्षित करण्यात आल्या. त्यानंतर प्रभाग क्रमांक 4,7,8,9,10, 12,13, 15,24, 28,30, 33,34, 35, 40, 46 असा 16 जागा महिलांसाठी राखीव करण्यात आल्या. चिठ्ठ्या काढून प्रभाग क्रमांक 19,17,44,22,20,14,38 अशा उर्वरित 7 जागा महिलांसाठी निश्चित करण्यात आल्या. 77 पैकी 38 जागा महिलांसाठी राखीव झाल्याने उर्वरित 39 जागा सर्वसाधारण खुल्या गटासाठी असणार आहेत.
गणपती बाप्पा मोरयाच्या घोषणा
वाकड, भूमकर वस्ती, कस्पटे वस्ती, वाकडकर वस्ती प्रभाग क्रमांक 38 मध्ये अ जागा अनुसूचित जातीसाठी, ब जागा ओबीसी महिलेसाठी राखीव झाली होती. क जागा सर्वसाधारण खुल्या गटासाठी राखीव झाल्याने एका गटाने आनंद साजरा करीत गणपती बाप्पा मोरयाचा घोषणा दिल्या. तर, इतर वेळेही काही कार्यकर्त्यांनी टाळ्या वाजविल्या.
आठ प्रभागातील तिन्ही जागांवर आरक्षण
एकूण 46 पैकी 8 प्रभागात सर्व तिन्ही जागांवर आरक्षण पडले आहे. त्यात 14, 17, 19, 20, 22, 38, 44 या प्रभागातील सर्वच्या सर्व तिन्ही जागांवर आरक्षण पडले आहे. प्रभाग 46 मध्ये चार 4 जागा असून, त्यातील 3 जागांवर विविध आरक्षणे आहेत. उर्वरित 38 प्रभागातील क ही जागा सर्वसाधारण असल्याने त्या खुल्या जागा आहेत. प्रभाग 46 मधील ड ही जागा सर्वसाधारण आहे.
23 प्रभागांत दोन महिला उमेदवार
प्रभाग क्रमांक 4, 7, 8, 9, 10, 12, 13, 14, 15, 17, 19, 20, 22, 24, 30, 33, 34, 35, 38, 40, 41, 44, 46 महिलांसाठी दोन जागा राखीव झाल्या आहेत. त्यामुळे त्या प्रभागात दोन नगरसेविका व एक नगरसेवक असणार आहे.
आरक्षण सोडतीला निरुत्साह
ओबीसी व सर्वसाधारण खुल्या गटातील आरक्षण सोडत शुक्रवारी (दि.29) चिंचवडच्या प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात काढण्यात आली. त्रिसदस्यीय प्रभागरचना बदलून चारची होणार असल्याची चर्चा असल्याने सोडतीच्या कार्यक्रमाला उपस्थित माजी नगरसेवक, कार्यकर्ते व इच्छुकांमध्ये निरुत्साह दिसला. प्रेक्षागृहातील अनेक खुर्च्या तसेच, आवारातील बहुतांश खुर्च्या रिकाम्या होत्या. आरक्षण सोडतीसाठी दर वेळेस मोठी गर्दी होते. प्रेक्षागृहात बसायला जागा पुरत नाही. प्रभागरचना बदलून पुन्हा चारची होणार असल्याची चर्चा असल्याने अनेकांनी सोडतीकडे पाठ फिरवली.