

पिंपरी : महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या अधिकार्यांना स्वच्छ सर्वेक्षण 2023 अंतर्गत टुल किट कामकाजासंदर्भात लोणावळा येथील एका हॉटेलमध्ये शनिवारी (दि. 17) प्रशिक्षण देण्यात आले. सर्वेक्षणाबाबत गुण आणि करावयाची कामे आदींची सविस्तर माहिती कार्यशाळेत देण्यात आली.
या वेळी आयुक्त राजेश पाटील, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, जितेंद्र वाघ, उल्हास जगताप, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय यांसह अन्य अधिकारी उपस्थित होते. केंद्र शासनाच्यावतीने स्वच्छ भारत अभियान सर्वेक्षण 2023चे कामकाज सुरू करण्यात आले आहे. त्यासाठीचे नियम, बदलेले गुणांकन आदींची माहिती देण्यात आली.
कोणत्या कामासाठी किती गुण आहेत. त्यासाठी पालिकेने काय करणे अपेक्षित आहे. कामाच्या रजिस्टर व माहिती, छायाचित्रे कशी अपलोड करायची आदी माहिती देण्यात आली. घनकचरा व्यवस्थापन, घरोघरी जाऊन ओला व सुका कचरा संकलन, विलगीकरण, कचराकुंडी मुक्त शहर, कचर्यावर प्रक्रिया, मोशी कचरा डेपो, सार्वजनिक शौचालय, सुशोभीकरण, नागरिक सहभाग आदी कामकाजाबाबत कशी माहिती संकलित करायची, त्याबाबचे छायाचित्रे कशी असावीत, त्यांच्या नोंदी कश्या कराव्यात, आदीबाबत सल्लागार एजन्सीच्या प्रतिनिधींनी सादरीकरण केले.
शहरात स्वच्छतेचे काम अधिक प्रभावीपणे व वेगात होण्यासाठी अधिकार्यांना कार्यतत्पर राहण्याची गरज असल्याचे आयुक्तांनी सांगितले. या चळचळीत नागरिकांचा सहभाग वाढविण्यावर भर देण्याचा सूचनाही देण्यात आल्या. तसेच, अस्वच्छता पसरविणार्या बेशिस्त नागरिकांवर कारवाईचा बडगा उगारण्याचे आदेश देण्यात आले.