

वर्षा कांबळे
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील महापालिका व खासगी शाळांमध्ये जवळपास 2 लाख 81 हजार 756 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यापैकी 1 लाख 96 हजार 542 विद्यार्थ्यांचे आधार कार्ड काढण्यात आले आहे, तर जवळपास 85 हजार 214 विद्यार्थ्यांचे आधार कार्डचे काम कोरोनामुळे शाळा बंद असल्याने तसेच मशिन ऑपरेटर नसल्यामुळे रखडले आहे.
पिंपरी – चिंचवड शहरात महापालिकेच्या 123 शाळा आहेत; तसेच 651 खासगी शाळा आहेत. या सर्व शाळांतील विद्यार्थ्यांचे आधार कार्ड काढण्याची जबाबदारी महापालिकेला देण्यात आली आहे. यासाठी आकुर्डी व पिंपरी या दोन उन्नत केंद्रांवर शासनाकडून प्रत्येकी दोन – दोन मशिन बसविण्यात आल्या आहेत. आधार कार्ड काढण्यासाठी शासनाकडील ऑपरेटर नेमण्यात आले होते.
मशिन चालविणारे ऑपरेटर यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर शासनाने आधार कार्ड काढण्यासाठी ऑपरेटर दिलेच नाहीत. त्यामुळे सध्या आधार कार्ड काढण्याचे काम ठप्प आहे.
या विषयावर नुकतीच बैठक घेण्यात आली. त्यामध्ये सर्व विषयतज्ज्ञांना संबंधित प्रभागातील आधारकार्ड मशिन सुरू आहे त्या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांचे आधार कार्ड काढण्याचे काम सुरू करण्याबाबत सांगितले आहे. याबाबत संबंधित मुख्याध्यापक आणि शिक्षकांनाही सूचना दिल्या आहेत. येत्या सोमवारपासून आधार कार्ड काढण्याचे काम सुरू होईल. आम्ही जादा मशिनची मागणी आयुक्तांकडे करणार आहोत.- संजय नाईकडे (प्रशासन अधिकारी, पिं.चिं.मनपा)
आधारमुळे बोगस विद्यार्थी उघड
शासनाने शालेय विद्यार्थ्यांची आधारनोंदणी करण्याची सूचना सर्व जिल्ह्यांतील शिक्षण विभागांना केली होती. त्यानुसार विद्यार्थ्यांचे आधार कार्ड क्रमांक शाळेच्या रजिस्टरला नोंद राहणार असल्याने एकाच विद्यार्थ्याचे नाव दोन शाळांत राहणार नाही. यातून बोगस विद्यार्थिसंख्या उघड होण्यास मदत होणार आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने प्रत्येक प्राथमिक व माध्यमिक शाळेला सूचना करून विद्यार्थ्यांचे आधार कार्ड काढून घेण्याची सूचना केली होती; परंतु आता ऑपरेटरच उपलब्ध होत नसल्याने शिल्लक राहिलेल्या विद्यार्थ्यांचे आधार कार्ड काढायचे कसे, असा प्रश्न उभा आहे.
शैक्षणिक कामात अडचणी
शालेय विद्यार्थ्यांची कोणतीही शैक्षणिक कामे, परीक्षा, ऑनलाइन अर्ज भरायचे झाल्यास आधार क्रमांक देणे गरजेचे असते. त्यामुळे विद्यार्थ्यांची आधार नोंदणी सक्तीची झाली आहे. दहावीचा परीक्षा अर्ज, शिष्यवृत्ती, डीबीटी योजना, शालेय पोषण आहार रक्कम आदींसाठी बँक खाते उघडण्यासाठी आधार क्रमांक द्यावा लागतो. ज्या विद्यार्थ्यांचे अद्याप आधार कार्ड नाही त्यांचे पालक व शिक्षकांना शैक्षणिक कामे करताना समस्यांचा सामना करावा लागत आहे.