पिंपरी : पुढारी वृत्तसेवा: पिंपरी-चिंचवड शहरात तब्बल 141 धोकादायक इमारती व घरे आहेत. अतिधोकादायक 70 इमारती असून, धोकादायक इमारतींची सर्वांधिक 69 संख्या 'ह' क्षेत्रीय कार्यालय हद्दीत आहे. त्या सर्व इमारतींना महापालिकेने नोटीस दिली आहे.
पालिकेच्या बांधकाम परवानगी विभागाच्या वतीने शहरातील धोकादायक बांधकामे स्वत:हून काढून घ्यावीत किंवा ती तातडीने दुरूस्त करून घ्यावीत, असे आवाहन दरवर्षी पावसाळ्यापूर्वी नागरिकांना केले जाते. अशा धोकादायक इमारती व घरांचा शोध घेऊन त्यांना क्षेत्रीय अधिकार्यांनी नोटीसा बजावल्या आहेत. अशा इमारतींची संख्या शहरात 141 आहे.
त्यातील 70 इमारती या अतिधोकादायक आहेत. सर्वांधिक 69 धोकादायक इमारती या 'ह' क्षेत्रीय कार्यालयाच्या दापोडी, फुगेवाडी, कासारवाडी, सांगवी या परिसरातील आहेत. त्यापैकी 67 इमारतींची दुरूस्ती करून घेण्यात आली आहे. उर्वरित दोन इमारत मालकांनी अद्याप प्रतिसाद दिलेला नाही. नोटीस दिल्यानंतर त्यातील 18 इमारती रिकाम्या करून त्याची दुरूस्ती करून घेण्यात आली आहे. तर, इमारती रिकाम्या न करता 9 इमारतींची दुरूस्ती केली गेली. 35 इमारतींची किरकोळ दुरूस्ती केली आहे. अद्याप, 44 इमारतींच्या मालकांनी पालिकेच्या नोटीशीला कोणताही प्रतिसाद दिलेला नाही.
नोटिशीला प्रतिसाद न देणार्या इमारतींवर कारवाई करू
पिंपरी-चिंचवड शहरातील धोकादायक इमारतींचा शोध घेऊन त्यांना महापालिकेने नोटीस दिली आहे. नोटिशीला प्रतिसाद देत बहुतांश नागरिकांनी स्वत:हून दुरूस्ती करून घेतली आहे. ज्यांनी प्रतिसाद दिला नाही, त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. शहरात धोकादायक इमारती पडण्याचे प्रमाण नगण्य आहे, असे शहर अभियंता मकरंद निकम यांनी सांगितले.
क्षेत्रीय कार्यालयनिहाय धोकादायक इमारतींची सद्यस्थिती
क्षेत्रीय कार्यालय इमारती दुरूस्ती प्रलंबित
अ 13 0 13
ब 7 7 0
क 4 4 0
ड 18 1 17
ई 6 6 0
फ 3 0 3
ग 21 12 9
ह 69 67 2
एकूण 141 97 44