पुणे : पुढारी वृत्तसेवा: पावसाळा सुरू झाला, की पुणेकरांना वेध लागतात ते पावसाळी पर्यटनाचे. याच पावसाळी पर्यटनाकरिता एसटी महामंडळाकडून विशेष सेवा सुरू करण्यात आली आहे. नागरिकांना एसटीनेच पर्यटनासाठी जाता येणार आहे. एसटीच्या पुणे विभागाने पावसाळी पर्यटनासाठी विशेष गाड्या सुरू केल्या आहेत.
पुण्यातून महाबळेश्वर, लोणावळा, माळशेज घाट, रायगड, हरिहरेश्वर या ठिकाणी पावसाळी पर्यटनासाठी विशेष एसटी बस धावणार आहेत. पुणे आणि परिसरात पावसाळी पर्यटनाची अनेक ठिकाणे आहेत. या पर्यटनस्थळांवर मोठी गर्दी होत असते. ही बाब लक्षात घेत एसटीकडून ही सेवा सुरू करण्यात आली आहे. त्याचा पुणेकरांनी लाभ घ्यावा, असे आवाहन एसटी महामंडळाकडून करण्यात आले आहे.
ग्रुप बुकिंगला प्राधान्य
पावसाळी पर्यटनासाठी एखाद्या 40 जणांच्या ग्रुपने बुकिंग केले, तर त्यांना प्राधान्याने संपूर्ण एक गाडी देण्यात येणार आहे. ही एसटीची गाडी त्यांना घरपोच सेवा देईल, असे एसटीचे पुणे विभागीय वाहतूक अधिकारी ज्ञानेश्वर रणावरे यांनी सांगितले.