

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहराला लागून असलेल्या खडकी व देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाकडे जमा होणारा कचरा महापालिकेच्या मोशी कचरा डेपोत आणून टाकला जात आहे. खडकीचा 7.60 टन आणि देहूरोड कॅन्टोन्मेंटचा 5.70 टन सुका कचरा दररोज जमा होता आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातून दररोज तब्बल 1 हजार 100 टन कचरा जमा होतो. तो मोशी कचरा डेपोत टाकलो जातो. खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचा कचरा अनेक वर्षांपासून शंकरवाडी, कासारवाडी येथील जागेत आणून टाकला जात आहे. पूर्वी मोकळे असलेल्या त्या परिसरात मोठ्या प्रमाणात लोकवस्ती झाली आहे. कचर्याच्या दुर्गंदीचा त्रास तेथील रहिवाशांना होत आहे. तर, देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचा कचरा विकासनगर, ट्रान्स्पोर्टनगर, निगडी येथे आणून टाकला जातो. त्यामुळे शहरातील नागरिकांना दुर्गंधीचा प्रचंड त्रास होत होता. हा कचरा वारंवार जाळला जात असल्याने दुर्गंधीसोबत वायू प्रदूषणही वाढले होते.
त्यावर उपाय म्हणून पालिकेने या दोन्ही कॅन्टोन्मेंटचा कचरा मोशी कचरा डेपोत स्वीकारण्यास मान्यता दिली आहे. त्या प्रस्तावाला तत्कालीन आयुक्त राजेश पाटील यांनी मंजुरी दिली होती. एक नोव्हेंबरपासून दोन्ही कॅन्टोन्मेंट बोर्ड आपल्या वाहनांतून सुका कचरा आणून मोशी डेपोत टाकत आहेत. खडकीचा दररोज 7.60 टन आणि देहूरोडचा 5.70 इतका कचरा जमा होत आहे. या कचर्याच्या विलगीकरण प्रक्रियेसाठी पालिका प्रत्येक टनासाठी कॅन्टोन्मेंटकडून 504 रुपये शुल्क घेत आहे. त्यांच्याकडून प्रत्येकी दीड लाख रुपये ठेव पालिकेकडे जमा करण्यात आले आहेत. पालिका ओला कचरा स्वीकारत नसून, तो संबंधित कॅन्टोन्मेंटला स्वत: जिरवावा लागणार आहे. दोन्ही कॅन्टोन्मेंट स्वत:ची सोय करेपर्यंत हा कचरा एक वर्षे कालावधीसाठी स्वीकारला जाणार असल्याचा दावा पालिकेच्या अधिकार्यांनी केला आहे.
खडकी व देहूरोड कॅन्टोन्मेंटचा सुका कचरा मोशी डेपोत 1 नोव्हेंबरपासून घेण्यात येत आहे. प्रत्येक टनासाठी पालिका 504 रुपये विलगीकरण शुल्क आकारत आहे. दाट लोकवस्तीजवळ हा कचरा टाकला जात असल्याने शहरातील नागरिकांना दुर्गंधीचा त्रास होत होता. तसेच, त्या कॅन्टोन्मेंटकडे पर्याय व्यवस्था नसल्याने तो कचरा पालिका स्वीकारत आहे, असे आरोग्य विभागाचे आरोग्य मुख्याधिकारी गणेश देशपांडे यांनी सांगितले.
कॅन्टोन्मेंटपाठोपाठ आळंदी, चाकण, देहूगाव, हिंजवडीचाही कचरा घेणार का?
शहरात जमा होणार्या कचरामुळे मोशी डेपोत कचराचे ढीग वाढतच आहेत. त्या कचर्याची विल्हेवाट लावण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. त्यात खडकी व देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचा कचरा महापालिका स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे. त्यापाठोपाठ शहराला लागून असलेल्या आळंदी, चाकण व देहूगाव नगर परिषद, हिंजवडी ग्रामपंचायत तसेच, जवळपासच्या गावांचाही कचरा घ्या म्हणून मागणी होऊ शकते. त्यांनी केंद्र व राज्य शासनाचे तसे पत्र आणल्यास महापालिकेस तो कचरा स्वीकारावा लागणार आहे. त्यामुळे भविष्यात हा मकचराफ पेटण्याची शक्यता आहे. तर, दुसरीकडे पालिका 100 किलोपेक्षा अधिक ओला कचरा शहरातील मोठ्या हाउसिंग सोसायट्यांकडून स्वीकारत नाही. त्यात शहराबाहेरचा कचरा कसा स्वीकारला जात आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.