पारगावात बिबट्याचे कांदा बराकीवर ठाण

पारगावात बिबट्याचे कांदा बराकीवर ठाण

पारगाव; पुढारी वृत्तसेवा: पारगाव (ता. आंबेगाव) येथील खारओढ्याजवळ बिबट्याने शेतकर्‍याच्या कांदा बराकीवर ठाण मांडले होते. ही घटना गुरुवारी (दि. 25) रात्री 9 वाजता घडली. खारओढा परिसर, पठारे वस्तीतील शेतकर्‍यांमध्ये यामुळे घबराटीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, गव्हाळी, लबडे मळा परिसरातदेखील बिबट्याचा वावर वाढला आहे. पारगाव येथील ट्रॅक्टर व्यावसायिक पंकज संतोष ढोबळे हे शेती मशागतीची कामे आटोपून सायंकाळी घराकडे जात असताना रात्री 9 वाजण्याच्या सुमारास खारओढ्याजवळ त्यांना दोन बिबटे दिसले.

त्यांनी ट्रॅक्टरचा वेग कमी केला. बिबट्यांवर ट्रॅक्टरच्या लाईटचा प्रकाश टाकला असता दोनमधील एक बिबट्या हा रस्त्याकडील कांदा बराकीवर चढून बसला. काही वेळ तेथेच बसून राहिला. खाली असलेला दुसरा बिबट्या तेथून निघून गेला. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी ज्ञानेश्वर अनाजी ढोबळे शेतकर्‍याच्या गोठ्यात शिरून बिबट्याने दोन शेळ्या ठार केल्या होत्या. या भागात बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात वाढल्याने वनविभागाने पिंजरा लावून त्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकर्‍यांनी केली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news