

खडकवासला : पुढारी वृत्तसेवा: पावसाळ्यात जून जवळपास कोरडा गेल्यानंतर जुलैच्या पहिल्याच दिवशी पानशेत-वरसगाव धरण परिसरात सकाळपासून पावसाची रिमझिम सुरू झाली. यंदाच्या पावसाळ्यात आज सर्वाधिक पाऊस पडला. काल सकाळी सहा ते आज सायंकाळी पाचपर्यंतच्या 36 तासांत टेमघर येथे सर्वाधिक 63 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. पावसाअभावी धरण क्षेत्रातील ओढे-नाले वाहण्यास सुरुवात झाली नाही. त्यामुळे धरणांतील पाणीसाठ्यात वाढ झाली नाही.
दिवसभरात पानशेत येथे 15, वरसगाव येथे 17, खडकवासला येथे 9 मिलीमीटर पाऊस पडला. पावसाअभावी धरणसाखळीत अल्प पाणीसाठा असल्याने प्रशासनाने पाणी पुरवठ्यात कपात केली आहे. रिमझिम पावसाने तूर्त दिलासा मिळाला आहे. मात्र, पाणीसाठा वाढण्यासाठी जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. जुलैच्या पहिल्याच दिवशी रायगड जिल्ह्यालगतच्या पानशेत -वरसगावच्या डोंगरी पट्ट्यासह टेमघर, सिंहगड भागात रिमझिमीबरोबर अधूनमधून सरी पडल्या.
त्यामुळे जोरदार पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या वर्षी 1 जुलै रोजी धरणसाखळीत 8.66 अब्ज घनफूट (टीएमसी) म्हणजे 29.72 टक्के पाणी होते. दिवसअखेर पानशेतमध्ये 19.13 व वरसगाव मध्ये 7.38 टक्के पाणी शिल्लक आहे. या दोन्ही धरणांतून खडकवासला धरणात पाणी सोडले जात आहे. खडकवासलात 22.46 टक्के आहे. धरणाचे जलाशय कमी झाल्याने कोरड्या पाणलोटात गाळ मातीचे मोठे तांडे दिसत आहे.