पाण्यासाठी गाठावे लागतेय स्मशान; कात्रज-कोंढवा रस्त्यावरील चित्र

पाण्यासाठी गाठावे लागतेय स्मशान; कात्रज-कोंढवा रस्त्यावरील चित्र
कोंढवा : ग्रामपंचायतीच्या जुन्या पाणीपुरवठा योजनेतील पाणी अपुरे पडू लागल्याने तसेच कडक उन्हाळ्यामुळे महापालिकेकडून टँकरने होणारा पाणीपुरवठाही सर्वच नागरिकांपर्यंत पोहचू न शकल्याने कोंढवा परिसरातील नागरिकांवर आपल्या घशाची कोरड भागविण्यासाठी अखेर चक्क स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी ठेवलेल्या नळांमधून पाणी भरण्याची वेळ आली आहे. कात्रज-कोंढवा रस्त्यालगत असलेल्या स्मशानभूमीत मृतदेहांवर अंत्यसंस्कार करताना लागणार्‍या पाण्यासाठी महापालिकेने या ठिकाणी एक नळ काढला आहे. या भागात तीव्र  पाणीटंचाई जाणवू लागल्याने सध्या या नळावर पिसोळी, उंड्री, वडाचीवाडी व येवलेवाडीतील काही नागरिक पिण्यासाठी पाणी भरत असल्याचे चित्र दिसून येत आहे. सायकल, दुचाकी, टेम्पो, रिक्षा या वाहनांतून नागरिक हे पाणी घरी घेऊन जात आहेत.
महापालिकेत समाविष्ट केलेल्या गावांमध्ये पाणीटंचाईची समस्या सुटण्याची अपेक्षा परिसरातील नागरिकांना होती. मात्र, ही समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. यामुळे नागरिकांची अवस्था आगीतून उठून फुफाट्यात पडल्यासारखी झाली आहे. केवळ कर मिळविण्यासाठी आमची गावे महापालिकेत समाविष्ट केली  आहेत का? असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
 या गावांमधील छोटीमोठी धरणे, विहिरी, कूपनलिका सध्या कोरड्या ठणठणीत पडल्या आहेत. महापालिकेकडे पाण्यासाठी  आस लावून बसलेल्या नागरिकांना कडक उन्हाचे चटके सोसत पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. जिथे तोंडात पाणी घेतले, तरी घरी जाऊन अंघोळ करणारा माणूस आज पिण्यासाठी स्मशानभूमीत पाणी भरत असल्याचे वास्तव या भागात दिसूनयेत आहे.

जलवाहिनी उरली नावापुरती

महापालिकेने हडपसर येथून चार इंची जलवाहिनी पूर्वी उंड्री, पिसोळीसाठी दिली होती. या वाहिनीतून दररोज एक लाख लिटर पाणी एक दिवस पिसोळी, तर एक दिवस उंड्री गावाला वितरित केले जायचे. मात्र, या जलवाहिनीस हडपसर भागात मोठ्या प्रमाणात अनधिकृत नळजोडणी झाल्यामुळे या गावांना आता एक थेंबही पाणी मिळत नाही. सध्या महापालिकेच्या वतीने काही टँकर जुन्या टाकीत व गावांतील विहिरींमध्ये टाकले जात आहेत. त्यातून नळ योजनेद्वारे पाणी वितरित केले जात असल्याचे पिसोळीचे माजी सरपंच मच्छिंद्र दगडे यांनी सांगितले.

जळणार्‍या प्रेताजवळ  भरले जातेय पाणी

स्मशानभूमीत एखादे प्रेत जळत असले, तरी देखील लोक या नळावर पाणी भरताना दिसत आहेत. महापालिका प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे चक्क स्मशानभूमीतील नळाचे पाणी पिण्यावाचून नागरिकांपुढे पर्याय उरला नाही. एवढी भीषण पाणीटंचाई सध्या या भागात जाणवत आहे. या अगोदर अशी परिस्थिती पाहिलीच नसल्याचे ज्येष्ठ नागरिक सांगत आहेत.
पिसोळीला पूर्वीप्रमाणे पाणीपुरवठा सुरू आहे. पिसोळी, उंड्री, वडाचीवाडी या भागांत जवळपास 110 टँकर पाणी दिले जात आहे. नागरिकांकडून पाण्याची मागणी वाढत असून, ती पूर्ण करण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
– काशिनाथ गांगुर्डे,  कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा विभाग
गावे महापालिकेत समाविष्ट करताना प्रशासनाने वाढत्या लोकसंख्येचा विचार केलेला दिसत नाही. पाण्यासह इतर सोयीसुविधांचा आराखडा तयार केला नाही. यामुळे या गावातील नागरिकांना सध्या पाणीटंचाईचे चटके बसत आहेत.
– दशरथ काळभोर,  माजी जिल्हा परिषद  सदस्य
आगीतून उठलो आणि फुफाट्यात पडलो. पाण्यासाठी मुंढवा सोडला आणि उंड्रीला आलो. चांगले दिवस येतील, असे वाटले होते. पण, स्मशानभूमीतून पाणी भरावे लागेल, असे स्वप्नातही वाटले नव्हते. टँकर परवडत नसल्याने घशाची तहान भागविण्यासाठी हे करावे लागत आहे.
– नारायण शिंदे, रहिवासी

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news