

टाकवे बुद्रुक :
अंदर मावळातील बेंदेवाडी जवळ दोन दिवसापूर्वी सायंकाळी पावणे सहाच्या दरम्यान एक रानगवा पाण्याच्या शोधात एका शेततळ्यात पडला. शेतकर्यांना घाबरून व स्वतःच्या अर्ध्या तासाच्या प्रयत्नानंतर कसाबसा तो रानगवा शेततळ्याच्या बाहेर पडला आणि जंगलाच्या दिशेने पळून गेला.
वनविभागास या घटनेची माहिती मिळताच वनरक्षक जयश्री गोंदवले व वन्यजीवरक्षक संस्थेचे निलेश गराडे, जिगर सोलंकी, निनाद काकडे व रेस्क्यू टीम पुणे त्याठिकाणी या रानगव्याचे प्राण वाचविण्यास हजर झाली. मात्र, त्याअगोदरच रानगवा तळ्याबाहेर पडून पळून गेला होता. गेल्या काही महिन्यांपूर्वी कुसगाव बुद्रुक येथे एका शेतकर्याच्या गोठ्याजवळ दोन रानगवे आढळले होते. त्यांना प्राणीमित्रांनी जंगलात सुखरूप पोहचवले होते.
पाण्याच्या शोध म्हणजे मृत्यूचा सापळा
उन्हाळ्याचे दिवस असल्याने मावळच्या सह्याद्री रांगेतील असलेले नैसर्गिक पाणवठे आटले आहेत. त्यामुळे वन्यप्राणी हे रात्रीच्या वेळी पाण्याच्या शोधात मानववस्थीत तसेच शिवारात भटकत आहेत.
जंगल व गावे आता एकत्र झाली आहेत. त्यामुळे वन्यप्राण्यांचा वावर वाढला आहे. रानगवा हा शांत स्वभावाचा प्राणी आहे. तो सहसा कोणावर हल्ला करत नाही. कोणताही वन्यप्राणी आढळल्यास घाबरून न जाता किंवा गोंधळ न करता त्याची वाट मोकळी करावी आणि वनविभागाला कळवावे. रात्रीच्या गस्त सुरु आहेत. तरीही कोणाला संशयास्पद शिकारी आढळल्यास त्यांनी वनविभागाला कळवावे.
– सुशील मंतावर, वनपरिक्षेत्र अधिकारी, शिरोता विभाग