पवनानगर : शालेय साहित्यांच्या दरवाढीमुळे पालक मेटाकुटीला

पवनानगर : शालेय साहित्यांच्या दरवाढीमुळे पालक मेटाकुटीला
Published on
Updated on

पवनानगर : कोरोनाच्या संसर्गामुळे दोन वर्षांनंतर ऑफलाइन शाळा सुरू झाल्या आहेत. परंतु, यंदा शैक्षणिक साहित्यांमध्ये 20-30 टक्क्यांनी वाढ झाल्यामुळे पालक मेटाकुटीला आले आहेत. मागील दोन वर्ष ऑनलाइन शिक्षण सुरू होते. त्यावेळी दरवर्षीप्रमाणे शालेय साहित्याची विक्री झाली नाही.

मात्र, यावर्षी शाळेची घंटा वाजली असून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाले आहे. शालेय साहित्याने बाजारपेठ सजली आहे. परंतु शालेय साहित्य दरात भरमसाठ वाढ झाली असल्यामुळे पालक त्रस्त झाले आहेत. वाढत्या महागाईमुळे त्रस्त झालेल्या पालकांच्या खिशाला शालेय साहित्य दरवाढीने कात्री लागत आहे. उन्हाळाच्या सुट्या संपल्यानंतर शाळा सुरू झाल्या आहेत. कोरोनाचे घटते प्रमाण आणि लसीकरणामुळे शाळा सुरू झाल्या आहेत.

बच्चे कंपनी खूप दिवसांनी शाळेत जायला मिळाल्यामुळे खूश आहेत. नवे दप्तर, नवीन कपडे, नवी पुस्तके आणि वह्या अशा सगळ्या शालेय वातावरणात मुले शाळेत जाताना दिसत आहेत. गेल्या वर्षी शंभर पेजेसच्या वह्यांचे दर प्रति डझन 200 ते 220 रुपये होते. ते यावर्षी 300 ते 350 रुपये, 200 पेजेस वह्यांचे दर प्रति डझन 350 वरून 600 रुपयांपर्यंत गेले आहेत. मागील वर्षी दहा नग पेनसाठी 35 रुपये लागत होते. यंदा यात 35 रुपयांची वाढ झाली आहे. याशिवाय स्कूलबॅग, वॉटर बॉटल, बूट, गणवेश व इतर साहित्यांचे दर किमान 25 ते 30 टक्क्यांपर्यंत वाढले आहेत.

कोरोनाच्या संकटामुळे अनेकांचे रोजगार हिरावले गेले. अनेकजण पूर्वीपेक्षा कमी मोबदल्यात काम करत आहेत. त्यात महागाईमुळे घर चालविताना कसरत करावी लागत असतानाच यात मुलांच्या शैक्षणिक खर्चाचाही पालकांवर बोजा पडणार आहे. महागाईमुळे शैक्षणिक साहित्य खरेदीसाठीही पालकांना जादा पैसे मोजावे लागणार आहेत. मागील वर्षाच्या तुलनेत सरासरी दोन ते अडीच हजार रुपयांचा अधिक भार पेलावा लागणार आहे.

कागद, वाहतूक खर्चात वाढ झाली असून त्यात कागदाच्या दरांसह वाहतूक खर्च वाढला आहे. सोबतच मजुरी, हमाली व इतर खर्च वाढल्याने शैक्षणिक साहित्यांचे दर वाढले आहेत. वह्यांचे दर 25 ते 30 टक्के, पेन दोन ते चार रुपये आणि स्कूल बॅगचे दर 30 टक्क्यांनी वाढले आहेत.
– रवींद्र जाधव, दुकानदार

गेल्या दोन वर्षे शाळा ऑनलाईन पद्धतीने शाळा सुरू होत्या. आता ऑफलाईन पद्धतीने शाळा सुरू झाल्या आहेत. मात्र, शालेय साहित्यांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या असल्यामुळे आमचे आर्थिक बजेट कोसळले आहे. वह्या-पुस्तकांचे दर वाढले असले तरी मुलांच्या शिक्षणासाठी त्याची खरेदी करावीच लागते. तेव्हा सध्या पुढील सहा महिन्यांकरिता पुरतील एवढे शैक्षणिक साहित्य खरेदी केले आहे.
– सागर ढोरे, पालक

 

किमतीत 20 ते 30 टक्क्यांनी वाढ
शालेय साहित्याचे दर (रुपयात)

पेन 7 ते 25
वॉटर बॅग 30 ते 200
कंपास पेटी 60 ते 200
टिफिन बॉक्स 70 ते 250
स्कूल बॅग 250 ते 600
वह्या (डझन) 550 ते 600

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news