पळसदेव : चिकन, मटण, माशांच्या मागणीत वाढ; दि. 28 पासून श्रावणाला सुरुवात

पळसदेवमधील मटण, चिकन, मासे, अंडी खरेदी करण्यासाठी अशी गर्दी केली होती.
पळसदेवमधील मटण, चिकन, मासे, अंडी खरेदी करण्यासाठी अशी गर्दी केली होती.

प्रवीण नगरे

पळसदेव : आखाड (आषाढ) महिन्यात मांसाहाराला प्राधान्य दिले जाते. बुधवार (दि. 28) पासून श्रावण महिना सुरू होत असल्याने मांसाहारप्रेमींनी आता आपला मोर्चा गावरान कोंबड्या, चिकन, मासे व अंड्याकडे वळविल्याचे चित्र सध्या ग्रामीण भागासह शहरी भागातही दिसून येत आहे. त्यामुळे चिकन, मासे, मटण, गावरान कोंबड्यांना मागणी वाढली आहे. मागील दोन वर्षांपासून कोरोना निर्बंधामुळे सार्वजनिकरित्या होणाऱ्या यात्रा, जत्रा तसेच आखाड पार्ट्यांवर निर्बंध घालण्यात आले होते.

त्यामुळे यात्रा कमी प्रमाणात व कमी लोकांच्या उपस्थितीत पार पडल्या होत्या; परंतु आता तसे वातावरण नसल्याने यात्रा मोठ्या प्रमाणात व उत्साहात होत असल्यामुळे गावरान कोंबड्यांना मागणी वाढली आहे. सध्या गावरान कोंबड्यांची आवकही चांगली आहे व त्यांना मागणी होत आहे. आषाढातील धार्मिक कार्यक्रमांमध्ये कोंबड्यांना मागणी वाढते. गौतम नागरिक श्रावणात मांसाहार वर्ज्य करतात, त्यामुळे आखाडच्या शेवटच्या टप्प्यात मांसाराला मागणी वाढते. मटण, चिकन, मासे, अंडी खरेदी करण्यासाठी मंगळवार, शुक्रवार व या रविवारी बाजारात गर्दी झालेली. शिवाय गावरान कोंबड्यांना इतर वेळेपेक्षा या वेळी मागणी वाढली आहे.

कोंबड्यांचे दर कमी!
सध्या दोन ते अडीच किलोचा कोंबडा 400 ते 600 रुपयांना विकला जात आहे. यासह दीड ते दोन किलोचा कोंबडा 450 ते 500 रुपयांना विकला जात आहे. यावरून चिकनचे दर पूर्वीपेक्षा कमी झाल्याचे दिसत आहे. दर कमी झाल्याने आषाढात चिकनप्रेमींना दिलासा मिळाला आहे.

महिनाभरापूर्वी चिकनचे दर 250 ते 260 रुपयांपर्यंत गेले होते. परंतु आता ते 180 ते 200 रुपयांपर्यंत खाली आले आहेत. त्यामुळे चिकन खवय्यांना मात्र दिलासा मिळाला आहे. तर मासळीचे दरदेखील स्थिर आहेत.
                                           – विकास भोसले, मालक, आदर्श सगुणा चिकन सेंटर

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news