पर्वतीतील टँकर भरणा केंद्राच्या खोलीत आग, कर्मचारी गंभीर जखमी

पर्वतीतील टँकर भरणा केंद्राच्या खोलीत आग, कर्मचारी गंभीर जखमी
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पर्वती जलकेंद्रातील टँकर पॉइंटशेजारील पंप चालू-बंद करण्याच्या नियंत्रण खोलीत मंगळवारी सकाळी सातच्या सुमारास आग लागली. या घटनेत एक कर्मचारी गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
धक्कादायक बाब म्हणजे, घटना घडली तेव्हा येथे एकही सुरक्षारक्षक उपस्थित नव्हता.  दरम्यान, ही आग नेमकी कशामुळे लागली, हे स्पष्ट होऊ शकलेले नाही.

ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली असल्याचा प्राथमिक अंदाज महापालिका अधिकार्‍यांनी व्यक्त केला आहे. लाला गणपत बांदल (वय 55, वडाचीवाडी, ता. हवेली, जि. पुणे) असे जखमी झालेल्या कर्मचार्‍याचे नाव आहे. बांदल हे येथील पाणीपुरवठा विभागात काम करतात. सकाळी साडेसात ते आठच्या सुमारास ही घटना घडली. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. बांदल जेथे काम करीत होते, तेथेच ही आग लागली. काही वेळातच आगीने मोठे स्वरूप धारण केले. आगीचा लोळ बांदल यांच्या अंगावर आला. ते तसेच बाहेर पळत आले. रात्रीच्या शिफ्टच्या कर्मचार्‍यांनी त्यांना पाहिले. त्यांनी बांदल यांना तत्काळ रुग्णालयात हलविले. घटनेची माहिती मिळताच दत्तवाडी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.

वारंवार घडताहेत गंभीर प्रकार…
पर्वती जलकेंद्रात वारंवार वीजयंत्रणेत बिघाड होतात. त्याबाबत महावितरण आणि महापालिकेत अनेकदा वादाची स्थितीही उद्भवली आहे. त्यामुळे अशा दुर्घटना घडू शकतात, ही बाब लक्षात घेऊन पाणीपुरवठा विभागाकडून आवश्यक ती सुरक्षा साधणे आणि उपकरणे ठेवणे आवश्यक आहे. या जलकेंद्रात उंदीर आणि घुशींचा सुळसुळाट झाला असून, त्या वीजवाहक तारा कुरतडतात. त्यामुळे वारंवार शॉर्टसर्किटचे प्रकार घडतात. असे असतानाही त्याकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्याने या दुर्घटनेला जबाबदार कोण, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

टँकर पॉइंटवर बांदल अनेक वर्षांपासून कार्यरत होते. ते कामावर असताना मंगळवारी सकाळी सातच्या सुमारास अचानक आग लागली. त्या वेळी तेथे बांदल एकटेच होते. टँकर पॉइंट सकाळी आठ वाजता सुरू होतो. त्यापूर्वीच ही घटना घडल्याने ती आग नेमकी कशाने लागली, हे बांदल यांच्याशिवाय कोणीच सांगू शकत नाही. बांदल सध्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. महावितरण आणि पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे, आम्हीही पाहणी केली आहे. अद्याप शासनाच्या इलेक्ट्रिकल इन्स्पेक्टरने पाहणी केलेली नाही. मुख्यमंत्र्यांच्या दौर्‍यामुळे मंगळवारी इलेक्ट्रिकल इन्स्पेक्टरने पाहणी केली नाही. ही पाहणी बुधवारी होईल. त्यानंतर रूममधील सीसीटीव्हीचा डीव्हीआर सुरक्षित असेल, तर नेमके काय झाले, ही उजेडात येईल. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
    – अनिरुद्ध पावसकर, विभागप्रमुख, पाणीपुवठा विभाग, महापालिका

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news