नेदरलँडच्या तरुणाशी ओळख पडली 11 लाखांना

नेदरलँडच्या तरुणाशी ओळख पडली 11 लाखांना

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  नेदरलँडच्या तरुणाशी झालेली ओळख पुण्यातील एका आयटी इंजिनिअर तरुणीला चांगलीच महागात पडली आहे. जीवनसाथी डॉट कॉम या विवाहविषयक संकेतस्थळावर ओळख झाल्यानंतर लग्नाची मागणी घालून संबंधित तरुणीला नेदरलँडवरून शगुन पाठविल्याचे सांगून सायबर चोरट्यांनी 11 लाख 16 हजार रुपयांचा आर्थिक गंडा घातला. याप्रकरणी विमाननगरमध्ये राहणार्‍या एका 29 वर्षांच्या तरुणीने विमानतळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार यावर्षी फेब्रुवारी ते 24 जून या कालावधीत घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी आय टी इंजिनिअर आहे. त्यांनी विवाहासाठी जीवनसाथी डॉट कॉम संकेतस्थळावर नाव नोंदणी केली होती. त्यातून त्यांची नेदरलँड येथील एकाशी ओळख झाली. त्यानंतर त्यांनी व्हॉट्सअ‍ॅप, व्हॉइस कॉलद्वारे संपर्क साधला. आपण नेदरलँड येथे असून फिर्यादीबरोबर लग्नास तयार असल्याचे सांगितले. त्यासाठी लग्नाकरिता शगुन पाठविल्याचे सांगितले़. त्यानंतर त्यांना फेब्रुवारीमध्ये कस्टम असे नाव असलेल्या मोबाईलवरून फोन आला.

तुमचे पार्सल आले आहे. त्याची कस्टम ड्युटी भरायची व वेगवेगळी कारणे सांगून त्यांच्याकडे पैशांची मागणी करण्यास सुरुवात केली. फिर्यादी त्याला भुलून पैसे भरत गेल्या. 11 लाख 16 हजार रुपये भरल्यानंतरही पार्सल न मिळाल्याने त्यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी सायबर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार अर्ज दाखल केला होता. त्यानुसार विमानतळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

'फॉरेनवाला' नव्हे, हे तर सायबर ठग !
विदेशात चांगल्या पगाराची नोकरी असलेल्या तरुणासोबत लग्न करण्याला तरुणी प्राधान्य देतात. याच संधीचा फायदा घेत सायबर चोरट्यांनी उच्चशिक्षित तरुणींना आपल्या जाळ्यात खेचून गंडा घालण्यास सुरुवात केली आहे. प्रामुख्याने विवाह विषयक संकेतस्थळावर नोंदणी केलेल्या तरुणींना हे ठग आपल्या जाळ्यात अडकवतात. तरुणींसोबत सुरुवातीला मैत्री केल्यानंतर आपण विदेशात मोठ्या पगाराच्या पदावर असल्याचे सांगतात. त्यासाठी तेथील फोटोदेखील पाठवतात.

व्हिडीओ कॉलद्वारे संवादसुद्धा साधतात. त्यानंतर एकेदिवशी अचानक मोठे विदेशी गिफ्ट किंवा चलन पाठवल्याचे सांगून कस्टम अधिकार्‍याशी संपर्क साधण्यास सांगतात. कथित कस्टम अधिकारीदेखील यांच्याच ट्रॅपचा एक भाग असतो. तो तरुणीला फोन करून माहिती देतो. त्यानंतर पाठवलेले गिफ्ट सोडवून घेण्याच्या बहाण्याने लाखो रुपये ते तरुणीकडून उकळतात. शेवटी पैसे भरून त्यांच्या हाती काहीच लागत नाही. त्यामुळे अशा ठगाबरोबर ओळख वाढून आर्थिक व्यवहार करण्याबरोबर सर्वांनी खात्री करावी, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news